धुळे दर्पण न्यूज :- समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्म भाव निर्माण होणे आवश्यक आहे. जी प्रगती दुसऱ्याच्या अधोगतीला कारण ठरते, ती प्रगती नव्हे. विकासाचा खरा अर्थ सर्वसमावेशकतेत असून, एकात्मतावादाच्या विचारातूनच समाज वर्धिष्णू होऊ शकतो, असे प्रतिपादन प्रा. प्रकाश पाठक यांनी केले.


  विद्यावर्धिनी महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने आयोजित पं. दीनदयाल उपाध्याय स्मृती व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी एकात्म मानवतावाद, अर्थव्यवस्था, भांडवलशाही, मार्क्सवाद तसेच सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर अभ्यासपूर्ण विचार मांडले.


भारताची अर्थव्यवस्था जगभरात प्रभावशाली

  आजच्या घडीला जागतिक अर्थव्यवस्था विकासाच्या संकल्पनेभोवती केंद्रित झाल्या आहेत. भांडवलशाही आणि मार्क्सवाद या दोन्ही विचारधारांनी विकासाच्या वेगवेगळ्या व्याख्या दिल्या, मात्र मार्क्सवाद संघर्षावर आधारित असल्याने तो मागे पडला. दुसरीकडे, भांडवलशाही स्वतःच्या सत्तेचा विस्तार करून एकाधिकारशाही निर्माण करू पाहत आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणेही त्याच दिशेने वाटचाल करत आहेत, असे प्रा. पाठक यांनी नमूद केले.

- Advertisement -
  दहा-पंधरा वर्षांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था विकसनशील टप्प्यात होती. मात्र, आज भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये गणला जात आहे. स्पर्धात्मक वातावरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला नवे बळ मिळाले आहे. परंतु हा विकास समतोल असावा आणि सर्व स्तरांपर्यंत पोहोचावा, असेही त्यांनी सांगितले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

एकात्म मानवतावाद आणि धर्माचा खरा अर्थ

  धर्म आणि कर्तव्य यांचा खरा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. आपण ज्याला ‘रिलीजन’ म्हणतो, ती केवळ एक उपासना पद्धती आहे. मात्र, धर्म म्हणजे कर्तव्यपूर्ती होय. त्यामुळे सर्वांच्या कल्याणाचा विचार करून समाजव्यवस्था उभारली पाहिजे. राजसत्ता मानव विकासाचे एक साधन आहे आणि ती सर्वच जण प्राप्त करू इच्छितात. त्यामुळे एकात्म मानवतावादाच्या संकल्पनेत सर्व विचारधारांचे एकत्रिकरण होणे आवश्यक आहे, असे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जगदीश पाटील यांनी स्पष्ट केले.


उल्लेखनीय उपस्थिती

  या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. योगेश पाटील, डॉ. राजविरेंद्रसिंग गावीत, पंजाबराय व्यास यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बाजीराव पाटील यांनी केले, तर आभार डॉ. सतीश निकम यांनी मानले.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -