धुळे दर्पण न्यूज :- विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने "लाडकी बहीण" योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपयांवरून २१०० रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणुकीनंतर दोन महिने उलटूनही महिलांच्या खात्यात हे वाढीव मानधन जमा झालेले नाही. त्यामुळे शासनाने त्वरित हे मानधन वाढवून थकबाकीसह जमा करावे, अशी मागणी शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील यांनी केली आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, लाडक्या बहिणींचे मानधन २१०० रुपये करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. महिलांनी सरकारच्या या वचनावर विश्वास ठेवून मतदान केले. मात्र, निवडणुकीनंतर सरकारने हे आश्वासन पाळले नाही. याउलट, गेल्या दोन महिन्यांचे मानधनही वेळेवर जमा झाले नसल्याने महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

महिला सन्मानासाठी सरकारने दिलेले वचन पाळावे

  लाडकी बहीण योजना ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. आर्थिक मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेला सरकारने प्राधान्य द्यावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -
  शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील म्हणाल्या, "महिला भगिनींनी महायुती सरकारवर विश्वास ठेवून मतदान केले. निवडणुकीपूर्वी मानधन वाढवण्याचे मोठे आश्वासन देण्यात आले. मात्र, आता केवळ १५०० रुपयेच जमा होत असल्याने महिलांची फसवणूक झाली आहे. सरकारने या योजनेसाठी तातडीने निधी उपलब्ध करून महिलांना २१०० रुपये मानधन जमा करावे. तसेच, मागील दोन महिन्यांचे थकबाकीही त्वरीत अदा करावी."

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

महिलांचे सरकारकडे प्रश्न – आश्वासन पाळणार की निवडणुकीपूर्वीचे फक्त गाजर?

  महिलांनी सरकारकडे स्पष्ट शब्दांत विचारले आहे की, निवडणुकीपूर्वी केलेल्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार? निवडणुकीपूर्वी मोठी आश्वासने दिली जातात, मात्र निवडणुकीनंतर त्या घोषणा हवेत विरतात, असा अनुभव वारंवार येत आहे. जर सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी दिलेले वचन पाळले नाही, तर याबाबत लढा उभारण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.


  यावेळी जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, संगीता जोशी, तारका विवेरेकर, ज्योती चौधरी, सुनीता वाघ आदी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांचा रोष वाढत असताना सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा याचा परिणाम आगामी राजकीय समीकरणांवर होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -