धुळे दर्पण न्यूज :- धुळे, शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील जनता हायस्कुलमध्ये शासनाने २०१२ मध्ये शिक्षक भरतीवर बंदी घातलेली असतानाही संस्थेत बेकायदेशीर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आल्याचा गंभीर आरोप संस्थेचे विश्वस्त विजय हुमराज कोळपकर यांनी केला आहे. त्यांनी याबाबत माहिती अधिकारांतर्गत विविध अर्ज करून माहिती मागविली, मात्र वारंवार टाळाटाळ केली गेल्याने अखेर त्यांनी लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने आजपासून (१८ मार्च) सकाळी ११ वाजता जनता हायस्कुलच्या प्रांगणात आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा कोळपकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
बंदीनंतरही शिक्षक भरती कशी?
पत्रकार भवन, साक्री रोड, धुळे येथे आयोजित पत्रकार परिषदेत विजय कोळपकर यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, "दि. २ मे २०१२ रोजी शासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीवर बंदी घातली होती. मात्र, त्यानंतरही जनता हायस्कुलमध्ये सहा ते सात शिक्षकांची भरती करण्यात आली. हे संपूर्णपणे बेकायदेशीर असून, वास्तविक रिक्त असलेल्या पदांवर जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता नवीन नियुक्त्या करून शासनाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन करण्यात आले."
माहितीच्या अधिकारातही अन्याय
कोळपकर यांनी सांगितले की, "मी २०१२ पासून जनता हायस्कुलमधील विविध गैरकारभारांविरोधात लढा देत आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांकडे माहितीच्या अधिकारांतर्गत १५ ते २० प्रकरणांबाबत माहिती मागविली. मात्र, सातत्याने टाळाटाळ करत मुख्याध्यापक व जनमाहिती अधिकारी यांनी माहिती दिली नाही. याशिवाय, जिल्हा प्रशासनानेही या प्रकरणाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यामुळे माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत मला मिळणाऱ्या कायदेशीर अधिकारांपासूनही मला वंचित ठेवले जात आहे."
शासनाकडे वारंवार अर्ज, पण न्याय शून्य
या संपूर्ण प्रकरणावर कोळपकर यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना अर्ज दिले. त्यामध्ये –
* मुख्याध्यापक, जनता हायस्कुल, चिमठाणे – वेळोवेळी एकूण १६ अर्ज
* जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, धुळे – ७ जानेवारी २०२५ रोजी अर्ज
* मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे – ७ जानेवारी २०२५ रोजी अर्ज
* शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग – ७ जानेवारी २०२५ रोजी अर्ज
* मंत्री, शिक्षण व क्रिडा विभाग, महाराष्ट्र राज्य – ८ जानेवारी २०२५ रोजी अर्ज
या सर्व तक्रारी असूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
मुख्य मागण्या:
१) मागितलेली माहिती माहिती अधिकार २००५ अंतर्गत पुरवावी.
२) २०१२-१३ नंतर करण्यात आलेली बेकायदेशीर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती तत्काळ रद्द करावी.
३) रिक्त असलेल्या जागांवर जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे.
४) २०२३-२४ आणि २०२४-२५ च्या संच मान्यतेनुसार रिक्त पदांवर "पवित्र पोर्टल"द्वारे नियमानुसार भरती करावी.
![]() |
| - Advertisement - |
विजय कोळपकर हे ६९ वर्षांचे असून, ते हृदयरोगाचे रुग्ण आहेत. सतत औषधोपचार सुरू असूनही त्यांनी सत्यासाठी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "जर माझ्या आरोग्यास अपाय झाला किंवा माझ्या जीवितास धोका निर्माण झाला, तर त्याला पूर्णतः मुख्याध्यापक आणि जिल्हा प्रशासन जबाबदार राहील."
जनतेच्या आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिक्षण विभाग कोळपकर यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेईल? बेकायदेशीर भरतीबाबत चौकशी केली जाणार का? माहिती अधिकाराचा भंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


