धुळे दर्पण न्यूज :- धुळे महापालिकेच्या सफाई कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संघर्षवादी सफाई कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली आजपासून तीन दिवसांचे धरणे आंदोलन सुरू केले आहे. सफाई कामगारांना घरे, वारसांना नियुक्ती पत्र, सातवा वेतन आयोग लागू करणे, सुरक्षा साधनांची व्यवस्था करणे यासह अन्य मागण्यांकडे महापालिकेचे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने संघटनेने हे तीव्र आंदोलन छेडले आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
सफाई कामगारांसाठी घरांच्या मागणीला महत्त्व
सफाई कामगार हे शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र परिश्रम घेत असतात. मात्र, त्यांचे स्वतःचे निवासस्थान असावे यासाठी शासनाने सुरू केलेल्या योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना ही सफाई कामगारांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी या योजनेसाठी निधी मंजूर केला जातो आणि धुळे महानगरपालिकेकडे पाठवला जातो. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा निधी वापरला जात नाही आणि परत गेला जातो. यामुळे अनेक सफाई कामगार बेघर अवस्थेत जीवन जगत आहेत. या पार्श्वभूमीवर, संघर्षवादी सफाई कामगार संघटनेने कामगारांना कायमस्वरूपी मालकी हक्काची घरे मोफत बांधून देण्याची मागणी केली आहे.
![]() |
| - Advertisement - |
सेवानिवृत्त व मयत सफाई कामगारांच्या वारसांना तत्काळ नोकरी द्यावी
सफाई कामगार जर सेवानिवृत्त, वैद्यकीय दृष्ट्या अक्षम किंवा मृत्यूमुखी पडला, तर त्याच्या वारसाला ३० दिवसांत नियुक्ती देण्याची तरतूद आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार, हे प्रकरण जलदगतीने निकाली काढले पाहिजे. मात्र, अनेक सफाई कामगारांच्या वारसांना अद्याप नोकरी मिळालेली नाही. त्यामुळे महापालिकेने ३० दिवसांच्या आत नियुक्ती पत्रे देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
वेतनवाढ, सुरक्षा साधनांची मागणी
सफाई कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करणे, वाढीव उपदान देणे आणि मानधन तत्वावर त्यांच्या मुला-मुलींना नोकरी देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, सफाई कर्मचारी रोज आरोग्यास धोका असलेल्या ठिकाणी काम करतात. त्यामुळे त्यांना आवश्यक सुरक्षासाहित्य जसे की साडी-गणवेश, स्वेटर, मफलर, चप्पल, गमबूट, पाट्या, झाडू, गटार पाडवी इत्यादी अत्यावश्यक वस्तू त्वरीत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
आंदोलनात प्रमुख कामगार नेते उपस्थित
या आंदोलनात संघर्षवादी सफाई कामगार संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते मुनाफ शेख कादर, बापूराव खरात, राजू पगारे, राजेंद्र बैसाणे, तव्वाब अन्सारी, सलीम बेग, सुनिल चित्ते, मोहन शेख, दिलीप माळी, आसिफ बेग, वसीम शेख, संजय तपासे, शफील शेख आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
महापालिकेने कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास, हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


