धुळे दर्पण न्यूज :- शहरातील ऐशी फुटी रोड परिसरात असलेल्या भंगारच्या गोदामाला सोमवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीने रौद्र रूप धारण करत गोदामालगत असलेल्या तीन घरांना गाठले. काही वेळातच ही घरे जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तब्बल १० बंबांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

आगीचे कारण शॉर्टसर्किट?

  नजर क्रिएशन स्टुडिओजवळ असलेल्या चौकातील अमर असरा यांचे भंगार साहित्याचे गोदाम आहे. या गोदामात लोह, प्लास्टिक, कचरा, खोक्यांसारखे ज्वलनशील साहित्य साठवलेले होते. सायंकाळी अचानक गोदामाला आग लागली. आगीने काही वेळातच मोठा भडका घेतला आणि शेजारच्या तीन घरांना गाठले. घटनास्थळी आगीचे लोट आणि धुराचे लव्हाळे दिसू लागले. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

- Advertisement -
स्थानिकांचा मदतीसाठी पुढाकार

  आगीची तीव्रता पाहता शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाण्याच्या बादल्या आणि घरगुती यंत्रणेद्वारे आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनीही वेळीच घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.

अफवांना मूठमाती

  घटनेनंतर परिसरात विविध अफवा पसरल्या होत्या. काहींनी आगीचा संबंध घातपाताशी असल्याची शक्यता व्यक्त केली. मात्र, पोलिसांनी तपासानंतर कोणताही घातपात नसल्याचे स्पष्ट केले. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

घटनास्थळी विजपुरवठा खंडित

  आगीमुळे विजेच्या तारा जळाल्याने परिसरातील विजपुरवठा खंडित झाला. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने विजपुरवठा बंद ठेवला असून, तो पुन्हा सुरू करण्याचे काम सुरू आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -