धुळे दर्पण न्यूज :- आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी धुळे महापालिकेत कर भरण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. महापालिकेने ३१ मार्चपर्यंत थकबाकी मालमत्ता करावरील शास्ती माफ केली होती. या निर्णयाचा फायदा घेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर कर भरला. शेवटच्या दिवशी एकाच दिवशी तब्बल १ कोटी ४४ लाख ६३ हजार ४६३ रुपये कर जमा झाला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत दररोज सरासरी १ कोटी रुपयांवर कर भरणा होत होता. मात्र, ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने कर भरण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे सोमवारी रमजान ईदची सुट्टी असतानाही मनपाचे कर भरणा केंद्र सुरू होते.
शहर भागातून ४३ लाख १४ हजार ९५० रुपये, हद्दवाढ भागातून ९२ लाख ३८ हजार रुपये, तर पाणीपट्टीपोटी ९ लाख १० हजार ५१३ रुपये जमा झाले. अशा प्रकारे एकूण १ कोटी ४४ लाख ६३ हजार ४६३ रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला.
सुटीच्या दिवशीही जिल्हा परिषदेत कामाचा जोर
महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदमध्येही शेवटच्या दिवशी मोठी लगबग पाहायला मिळाली. ईद निमित्ताने सोमवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी होती. मात्र, आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने जिल्हा परिषद, जिल्हा कोषागार कार्यालय, निबंधक कार्यालय दिवसभर सुरू होते.
![]() |
| - Advertisement - |
कर्मचाऱ्यांनी प्रलंबित बिले तयार करण्यावर भर दिला. ही बिले कोषागार कार्यालयाकडे तातडीने पाठवण्यात आली. कोषागार कार्यालयात रात्री उशीरापर्यंत काम सुरू होते. रात्री १२ वाजेपर्यंत प्राप्त होणारी देयके स्वीकारली जात होती. यावेळी कर्मचारी दिवसभर कामात व्यस्त होते.
बँकांमध्येही मोठी गर्दी
महिन्याचा शेवटचा दिवस आणि आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असल्याने बँकांमध्येही ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर व्यवहार केले. कर भरणा, देयके अदा करणे, विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँकांमध्ये रांगा लागल्या होत्या.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
महापालिकेची महसूल वाढीचा प्रयत्न यशस्वी
महापालिकेच्या शास्ती माफी निर्णयाचा मोठा फायदा नागरिकांनी घेतला. थकबाकीदारांनी मोठ्या प्रमाणावर कर भरणा केल्याने महापालिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर महसूल जमा झाला. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी झालेल्या या मोठ्या वसुलीमुळे मनपाचा महसूल वाढला असून याचा फायदा शहराच्या विकास कामांना होणार आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


