धुळे दर्पण न्यूज :- शहरातील रस्त्यांच्या कामासाठी कागदोपत्री मुरुम व खडी दाखवून प्रत्यक्षात कोट्यवधींचा अपहार करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार व शिवसेना (उबाठा) नेते अनिल गोटे यांनी केला आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुमारे तीन कोटी रुपये हडप केल्याचा दावा त्यांनी केला असून, या प्रकरणी वनविभाग तसेच पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा उच्चांक मोडला – गोटे
पत्रकार परिषदेत बोलताना गोटे यांनी सांगितले की, नगाव बारीलगत, सरकारी धान्य गोडाऊन ते धुळे-बिलाडी रस्त्याच्या नावाखाली महानगरपालिकेने १ कोटी ६१ लाख रुपये तिजोरीतून उचलून घेतले. तसेच काही ठेकेदारांना हाताशी धरून, गरज नसतानाही धुळे शहरालगतच्या गावांना जोडण्यासाठी अजून १.५ कोटी रुपये खर्च झाल्याचे कागदोपत्री दाखवले आहे. मात्र, प्रत्यक्षात हा निधी अपहार करून हडप करण्यात आला.
धुळे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात (DP) जुना आग्रा रोड ते धुळे-बिलाडी हा सुमारे २.५ किमी लांबीचा आणि ३० मीटर (१०० फूट) रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. हा रस्ता वनविभागाच्या ताब्यातील सर्वे क्रमांक ४६ व १३४ मधून जाणार आहे. अशा परिस्थितीत वनखात्याकडून ५ हेक्टर ४० आर क्षेत्र परवानगीने घेणे आवश्यक होते.
कागदोपत्री खेळ – भ्रष्ट अधिकाऱ्यांची युक्ती
गोटे यांनी आरोप केला की, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वनखात्याची मंजुरी न घेता, नियम डावलून हा रस्ता मंजूर केला. नियमानुसार १ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र विकासासाठी वापरण्यासाठी भोपाळ व दिल्ली येथील वनखात्याच्या मुख्यालयाकडून मंजुरी घ्यावी लागते. मात्र, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी नामी युक्ती वापरली.
"एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असल्यास स्थानिक वनअधिकारी परवानगी देऊ शकतात, हे पाहून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी १५० मीटर लांबीचा आणि १० मीटर रुंदीचा रस्ता कागदोपत्री मंजूर केला. वास्तविक, हा रस्ता पूर्ण विकसित केला गेला नाही. फक्त कागदोपत्री खर्च दाखवून निधी लाटला," असा आरोप गोटे यांनी केला.
मुरुम, खडी रस्त्यावर नव्हे तर बाजारात विकली?
गोटे यांनी आणखी एक गंभीर आरोप करताना सांगितले की, "वनविभागाच्या जमिनीतून कोणतीही परवानगी न घेता गौण खनिज (मुरुम, खडी, दगड) मोठ्या प्रमाणात काढून विक्री करण्यात आली. साधारणतः १०० फूट रुंद व किमान १० फूट खोल एवढ्या मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उपसा करून ते रस्त्यावर वापरण्याऐवजी बाजारात विकले गेले."
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
रस्त्याच्या कामासाठी रोलर फिरवले गेले नाहीत, तसेच बाजूला चार फूट खोल आणि तीन फूट रुंदीच्या चरामधून मोठ्या प्रमाणावर मुरुम गायब झाल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.
पालिकेच्या पूर्वीच्या निर्णयावर हरताळ
यापूर्वी, पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी दिलीप पायगुडे यांनी महापालिकेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी शहरात खडी, मुरुम टाकण्यावर बंदी घातली होती. कारण, एका ट्रॅक्टरच्या मुरुमासाठी डझनभर ट्रॅक्टरचे बिल काढले जात होते. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, सध्याच्या प्रशासनाने तो ठराव धाब्यावर बसवत मोठ्या प्रमाणावर अपहार केला आहे.
"महिला अधिकारी असल्याचा गैरफायदा घेतला जातोय" – गोटे
महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनीच ही संपूर्ण योजना मंजूर केल्याचा आरोप करताना गोटे म्हणाले, "महिला अधिकारी असल्याने त्यांच्यावर थेट आरोप करणाऱ्यांना विरोध होतो. मात्र, त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना अभय दिले आहे. ही धुळेकरांची फसवणूक आहे."
![]() |
| - Advertisement - |
पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यावरही निशाणा
पत्रकार परिषदेत गोटे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यावरही आरोप केले. "रावल कुटुंबाने तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची कोट्यवधींची जमीन हडप केली होती. धुळे न्यायालयाने ती जमीन परत करण्याचे आदेश दिले आहेत. यातून भाजप मंत्र्यांची दादागिरी उघड झाली आहे," असा गंभीर आरोप गोटे यांनी केला.
"धुळे शहर लुटायचं ठरवलंय का?" – अनिल गोटे
"जर प्रत्येकाने मिळेल तितकं खायचं ठरवलं, तर धुळे शहराला वाचवणार कोण? देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी येऊन शहर वाचवणार आहेत का?" असा संतप्त सवाल गोटे यांनी उपस्थित केला. तसेच, "या प्रकरणात दोषींवर वन (संवर्धन) अधिनियम १९८० आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांच्या आधारे कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा, आम्ही हे प्रकरण थेट उच्च न्यायालयात घेऊन जाऊ," असा इशाराही त्यांनी दिला.
महानगरपालिका प्रशासनाला मोठा धक्का?
गोटे यांच्या आरोपांमुळे महानगरपालिका प्रशासन हादरले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. आता वनविभाग आणि पोलीस यावर कोणती कारवाई करतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
---
(धुळे दर्पणसाठी विशेष बातमी – सैय्यद सानिल)
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


