धुळे दर्पण न्यूज :- आक्षेपार्ह विधान करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन भारतीय जनता पक्षाच्या चंद्रशेखर आझाद नगर मंडळाकडून आज सकाळी करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आ. अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
काय आहे प्रकरण?
आ. अबू आझमी यांनी औरंगजेबबद्दल गौरवोद्गार काढत संभाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. त्यांच्या विधानामुळे समाजात तणाव निर्माण झाला असून, देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संभाजी महाराजांनी बलिदान देत हिंदू धर्म रक्षण केला, त्यांचा छळ करणाऱ्या औरंगजेबाचे समर्थन करणे हा भारतीय इतिहासाचा अपमान आहे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
धुळे शहरात जोरदार निदर्शने
धुळे शहरातील प्रकाश टॉकीज चौकात भाजप चंद्रशेखर आझाद मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले. संतप्त कार्यकर्त्यांनी आ. अबू आझमी यांच्या विधानाचा निषेध नोंदवला आणि त्यांचा पुतळा जाळत घोषणाबाजी केली.
![]() |
| - Advertisement - |
"देशविघातक विचारांना थारा नाही" – भाजप नेते
यावेळी भाजप चंद्रशेखर आझाद नगर मंडळाचे अध्यक्ष बबनराव चौधरी यांनी सांगितले की, "ज्या लोकांनी देशाच्या इतिहासाचा अपमान केला, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. अशा समाजविघातक विचारांना भारतात थारा नाही. आम्ही शासनाला मागणी करतो की आ. अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी."
न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा
यावेळी कार्यकर्त्यांनी जर आ. अबू आझमी यांच्यावर तातडीने कारवाई झाली नाही, तर न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला. तसेच, भविष्यात पुन्हा अशा प्रकारची वक्तव्ये कुणी केली, तर भाजप कार्यकर्ते याला तीव्र विरोध करतील, असा इशाराही देण्यात आला.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
आंदोलनात सहभागी कार्यकर्ते
या आंदोलनात भाजप नेते दिनेश बागुल, महेंद्र शेणगे, राजनीश निंबाळकर, शरद चौधरी, विनायक अहिरे, अनिल धोरात, अमृत चौधरी, विनोद खेमणार, पंकज धात्रक, कार्तिक मराठे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
पोलीस प्रशासनाची खबरदारी
या आंदोलनादरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला. मात्र, आंदोलन शांततेत पार पडल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

