धुळे दर्पण न्यूज :-  घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने सक्रिय असलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने अटक केली आहे. या दोघांनी धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, आरोपींविरुद्ध २३ गुन्हे दाखल असून, त्यांनी यापूर्वीही शिक्षा भोगली आहे.


सोनगीर येथील घरफोडीचा छडा

  सोनगीर (ता. धुळे) येथे २ फेब्रुवारी रोजी भरदिवसा घरफोडी झाली होती. भूषण जिवन माळी यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी दुपारी दोनच्या सुमारास प्रवेश करून ३६ हजारांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेची तक्रार सोनगीर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत असताना या गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

गोपनीय माहितीच्या आधारे अटक

  ५ मार्च रोजी एलसीबीचे निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भरदिवसा घरफोडी करणारे सराईत चोरटे धुळ्यात सक्रिय आहेत. या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने सापळा रचत संशयित इरफान ऊर्फ मुन्ना मोहम्मद हसन अन्सारी (वय ४७, रा. चाँदतारा चौक, धुळे) आणि जाकीर शाह भिकन शाह फकीर (वय ५०, रा. मरकज मशिदीजवळ, चाँदतारा चौक, धुळे) यांना ताब्यात घेतले.

- Advertisement -
घरफोडीची कबुली आणि मुद्देमाल जप्त

  पोलिसी खाक्या दाखवताच या दोघांनी सोनगीरसह इतर अनेक ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे कानातील टॉप्स, गुन्ह्यात वापरलेली एमएच-१८ अॅक्यू-८४६७ क्रमांकाची दुचाकी, लोखंडी टॉमी आणि १२ हजारांची रोकड असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


अट्टल गुन्हेगारांचा गुन्हेगारी इतिहास

  इरफान ऊर्फ मुन्ना अन्सारी आणि जाकीर शाह हे दोघेही गुन्हेगारी विश्वातील सराईत आरोपी आहेत. या दोघांवर यापूर्वीही चोरी, घरफोडी आणि इतर गंभीर गुन्हे दाखल असून, त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. मात्र, शिक्षा भोगल्यानंतरही त्यांनी पुन्हा गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

पोलिसांचा पुढील तपास सुरू

  एलसीबीच्या पथकाने या दोघांच्या इतर गुन्ह्यांचा तपास सुरू केला असून, त्यांच्याकडून आणखी चोरीच्या घटनांचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. दोघांना पुढील चौकशीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -