धुळे दर्पण न्यूज :- बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीसह भारतीय बौद्ध महासभा व इतर बौद्ध संघटनांनी आज धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी महाबोधी विहाराचा व्यवस्थापन कायदा बदलण्याची मागणी केली आहे.
महाबोधी विहार : ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व
बौद्ध धर्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध यांना ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, तो बोधीवृक्ष बौद्धगया येथील महाबोधी महाविहार परिसरात आहे. सम्राट अशोक यांनी इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात या महाविहाराचे बांधकाम केले. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा असलेल्या या पवित्र स्थळाला जगभरातील बौद्ध भिक्खू आणि अनुयायी भेट देतात.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
मात्र, १९४९ साली तयार झालेल्या व्यवस्थापन कायद्यानुसार महाविहाराचे नियंत्रण पाच हिंदू ब्राह्मण व चार बौद्ध सदस्यांच्या समितीकडे आहे. यामुळे बौद्धांचे संख्याबळ कमी असल्याने व्यवस्थापनावर ब्राह्मणांचे वर्चस्व आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या ठिकाणी ब्राह्मण पुरोहित पद्धतीने पूजा-अर्चा करतात, कर्मकांड करतात, जे बुद्धांच्या शिकवणुकीच्या विरोधी आहे. त्यामुळे महाबोधी विहाराच्या संपूर्ण नियंत्रणाची जबाबदारी बौद्ध संघटनांकडे देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेने केली आहे.
१९९२ पासून सुरू आहे संघर्ष
महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापन अधिकारासाठी १९९२ पासून विविध बौद्ध संघटना आंदोलन करत आहेत. मात्र, अद्याप कायद्यात कोणताही बदल झालेला नाही. आंदोलनकर्त्यांनी असेही सांगितले की, १९५० साली भारत सार्वभौम राष्ट्र म्हणून घोषित झाले. त्यामुळे १९४९ पूर्वीच्या सर्व जुन्या कायद्यांचा फेरविचार करण्यात आला. मात्र, बौद्धगयाच्या महाविहाराबाबत १९४९ चाच कायदा आजही लागू आहे, जो अन्यायकारक असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
धुळे जिल्ह्यात महाधरणे आंदोलन
बौद्धगया महाविहाराच्या नियंत्रणासाठी देशभरात आंदोलने होत असताना, धुळे जिल्ह्यातही आज वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष देवीदास जगताप, महेंद्र महाले, बी. टी. अहिरे, जितेंद्र शिरसाट, रविकांत वाघ, शंकर खरात, जिल्हा संघटक आकाश बागूल, योगेश पगारे, सागर चव्हाण, विशाल महाले, आकाश येलेकर, चंद्रमणी वाघ, सीताराम वाघ, दिलीप बोरसे, राहुल पाटोळे, मोहन वाघ यांच्यासह असंख्य बौद्ध बांधवांनी सहभाग घेतला.
![]() |
| - Advertisement - |
आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारला मागणी केली आहे की, महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायद्यात सुधारणा करून संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध संघटनांकडे सोपवले जावे. याकरिता संसदेत विधेयक मांडून लवकरात लवकर हा कायदा बदलावा, अन्यथा संपूर्ण देशभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.
सरकारने लक्ष घ्यावे : वंचित बहुजन आघाडी
धुळे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे की, बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळावर अन्य धर्मीयांचे नियंत्रण असणे अन्यायकारक आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ महाबोधी विहाराच्या व्यवस्थापनावर फेरविचार करून हा निर्णय बौद्ध धर्मियांच्या बाजूने घ्यावा, अन्यथा मोठे जनआंदोलन उभे केले जाईल.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
बौद्ध बांधवांमध्ये संताप
या मुद्द्यावरून बौद्ध बांधवांमध्ये मोठा रोष असून, महाबोधी विहाराच्या मुक्ततेसाठी देशभरात व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. देशभरातील बौद्ध संघटनांनी एकत्र येत महाविहाराच्या व्यवस्थापनावर बौद्धांचेच नियंत्रण असावे, यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
(धुळे दर्पण – विशेष प्रतिनिधी)
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



