धुळे दर्पण न्यूज :- शहरातील अलंकार सोसायटी परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने धुळेकरांना हादरून टाकले आहे. विद्यापीठात द्वितीय क्रमांकाने यश मिळवणाऱ्या आणि भविष्यासाठी स्वप्न पाहणाऱ्या प्रथमेश बागड (वय २२) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

    प्रथमेश बागड हा मूळचा चाळीसगाव रोड परिसरातील रहिवासी असून, त्याचे वडील प्रदीप बागड हे रिक्षा चालक आहेत. आर्थिक परिस्थिती फारशी सशक्त नसतानाही प्रथमेशने शिक्षणात उत्तुंग यश मिळवले होते. दहावीत ९० टक्के गुण मिळवून त्याने बीएस्सीनंतर आयटी क्षेत्रात एमसीएचे शिक्षण पूर्ण केले होते. नुकत्याच झालेल्या विद्यापीठ परीक्षेत तो दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता.

- Advertisement -



कॅम्पस इंटरव्ह्यू आणि आत्महत्येचा निर्णय

    प्रथमेशने म्हैसूर येथील एका खाजगी आयटी कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यू दिला होता. नोकरी मिळण्याच्या प्रतिक्षेत असताना त्याने अचानक राहत्या घरी बाथरूममध्ये गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचे निधन झाले. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

"घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी बागड कुटुंबाशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले."

पोलीस अधीक्षकांची भेट व पुढील पावले

   घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी बागड कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यापूर्वीदेखील एका आत्महत्येप्रकरणात त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला होता. समाजात अशा हृदयद्रावक घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आता पोलिस प्रशासन सेवाभावी संस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष तणावमुक्ती शिबिरे व कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय घेत आहे.


मनातील अस्वस्थता आणि खर्चाचा ताण

   प्रथमेशचा आत्महत्येचा नेमका कारण अद्याप स्पष्ट झालेला नसला, तरी कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तो आपल्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी होणाऱ्या खर्चाबाबत सतत चिंतेत असायचा. “आपल्यामुळे घरावर खर्चाचा भार वाढतोय,” अशी भावना तो व्यक्त करत असे. त्याला फारसे मित्रही नव्हते आणि तो बहुधा एकटाच राहत असे.

- Advertisement -

समाजासाठी धक्कादायक इशारा

   विद्येच्या क्षेत्रात प्रगती करत असतानाही मानसिक ताण आणि नैराश्य यामुळे तरुणांचे जीव जात असतील, तर हा समाजासाठी गंभीर इशारा आहे. पालक, शिक्षक, प्रशासन आणि संपूर्ण समाजाने मिळून या बाबतीत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम