धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी गुंतवणूक परिषद २०२५ पूर्वतयारी बैठकीचे आयोजन काल यशस्वीरित्या पार पडले. ही महत्त्वपूर्ण बैठक आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. आ. अग्रवाल हे गुंतवणूक परिषद २०२५ चे मुख्य समन्वयक असून, त्यांच्या पुढाकाराने ही बैठक अधिक प्रभावी ठरली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या बैठकीत धुळे एमआयडीसीसह साक्री, नरडाणा आणि शिरपूर परिसरातील विविध औद्योगिक क्षेत्रातील प्रतिष्ठित उद्योजक व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीचा प्रमुख उद्देश म्हणजे गुंतवणूक परिषद २०२५ साठी औद्योगिक पातळीवर एकत्रित प्रयत्न करून जिल्ह्यातील आर्थिक आणि रोजगारवाढीच्या संधी वाढविणे हा होता.
औद्योगिक संधींची चर्चा
या प्रसंगी आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी धुळे जिल्ह्यातील औद्योगिक संधींवर प्रकाश टाकत गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा मानस व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “धुळे जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणुकीची मोठी क्षमता असून, ही परिषद उद्योजकांसाठी नवी दारे उघडणारी ठरेल.”
तसेच, त्यांनी सर्व उद्योजकांना एकत्र येऊन या परिषदेचे यश सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. परिषदेमुळे स्थानिक पातळीवर नविन रोजगार निर्मिती होईल आणि आर्थिक दृष्टिकोनातून जिल्हा स्वयंपूर्ण होईल, असेही त्यांनी नमूद केले.
![]() |
| - Advertisement - |
बैठकीत पुढील मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली:
एमआयडीसीचा विस्तार व औद्योगिक प्लॉट्सची उपलब्धता
जिल्ह्यातील विजेची असलेली समस्या व उपाययोजना
नविन उद्योजकांसाठी शासनस्तरावर उपलब्ध असणाऱ्या विविध योजना आणि सवलती
गुंतवणूक परिषद २०२५ साठी एमओयू (करारनामे) ची पूर्वतयारी
ही बैठक पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांच्या सूचनेनुसार धुळे गुंतवणूक परिषद महाराष्ट्रातील आदर्श परिषद ठरण्याच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
उपस्थित मान्यवर व उद्योजक
या बैठकीस उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये प्रमुखतः श्री. ओमप्रकाशजी अग्रवाल, नितीन देवरे (धुळे अवधान मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन), भरत अग्रवाल (खानदेश औद्योगिक विकास संघटना), नितीन बंग (खानदेश औद्योगिक विकास परिषद), वर्धमान संघवी (लघुउद्योग भारती), महेश नावारकर (शेतकरी असोसिएशन), नितीन पाटील (स्टेटस ग्लोबल ट्रस्ट) यांचा समावेश होता. तसेच श्री. संजय देसले, राहुल मुंदडा, जी.बी. मोदी, श्रीराम देशपांडे, राजेंद्र जाखडी, राहुल कुलकर्णी, राजेश गोंडोदिया, दिलीप अग्रवाल, सौरव जोशी, सागर जोशी आदी उद्योजकही उपस्थित होते.
उद्योजकांची उत्स्फूर्त भूमिका
बैठकीत सहभागी सर्व उद्योजकांनी गुंतवणूक परिषदेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जिल्ह्यातील औद्योगिक विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची तयारी दर्शविली. येणाऱ्या काळात परिषदेमध्ये अधिकाधिक उद्योजकांनी सहभाग नोंदवावा आणि धुळे जिल्ह्याला उद्योगनगरी म्हणून ओळख मिळवून द्यावी, यासाठी प्रयत्नशील राहण्याचे ठरले.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


