धुळे दर्पण न्यूज :- धुळे  शहरातील अन्वर नाला परिसरात एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यावर अज्ञात तिघांनी हल्ला करून सुमारे १ लाख ६५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोटरसायकलवरून जात असताना घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मोहाडी पोलीस ठाण्यात अज्ञात लुटारूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

ही घटना दि. ४ एप्रिल रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. आकाश छोटू कोळी (वय २४, रा. अमळथे, ता. नंदुरबार, ह.मु. धुळे) हे भारत फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी कार्यरत आहेत. दररोजप्रमाणे त्यांनी रानमळा परिसरातून महिलांच्या बचत गटांकडून गोळा केलेली रोकड कंपनीच्या कार्यालयात जमा करण्यासाठी चाळीसगाव चौपुलीकडे मोटरसायकल (MH-39/F-0671) ने प्रवास सुरू केला होता.

- Advertisement -

  मात्र, अन्वर नाल्याच्या पुढे मन्नत रेसीडेन्सीच्या अलीकडे असलेल्या कच्च्या रस्त्यावर तोंडाला रुमाल बांधून थांबलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी आकाश कोळी यांना अडवले. त्यानंतर त्यांनी त्यांना काठी व हाताने मारहाण करत त्यांच्या जवळील रोख रक्कम असलेली बॅग आणि मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी मोटरसायकलची चावी देखील हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून फरार झाले.


  या घटनेनंतर आकाश कोळी यांनी तत्काळ मोहाडी नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात तीन लुटारूंविरुद्ध कलम 392, 323, 504, 506 भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून, घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

पोलीस प्रशासन सतर्क

  या घटनेनंतर मोहाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. व्यापारी व आर्थिक संस्था प्रतिनिधींनी अधिक सुरक्षिततेची मागणी केली आहे. दरम्यान, मोहाडी पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून लवकरच आरोपींचा माग काढून त्यांना अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -