धुळे दर्पण न्यूज :- शहरातील सराफ बाजारात सोमवारी सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्याने खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ३ टक्के जीएसटीसह प्रतितोळा ९९,९१० रुपयांवर पोहोचल्यामुळे बाजारातील व्यवहार तब्बल ५० टक्क्यांनी घटले आहेत. लग्नसराईच्या तोंडावर आलेल्या या दरवाढीमुळे ग्राहक संकोचले असून, नव्या दागिन्यांच्या खरेदीपेक्षा संचित सोन्याचा वापर करण्याकडे कल वाढला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर सोने
सोन्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी दागिन्यांची खरेदी आता कठीण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, अमेरिकेने वाढवलेले आयात शुल्क आणि जागतिक अर्थकारणातील अस्थिरता यामुळे सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येतो आहे.
मोघम अंदाजामुळे मोडीतही घट
दर वाढले तरीही जुनं सोने मोडून त्याऐवजी नवे दागिने घेण्याची प्रवृत्तीही फारशी दिसून येत नाही. कारण पुढे दर कमी होतील का याबाबत निश्चित अंदाज नसल्यामुळे गुंतवणूकदारांपासून सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत अनेकांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. बाजारात भ्रम निर्माण झाल्याने ग्राहक मागे हटले आहेत.
![]() |
| - Advertisement - |
सोन्याच्या दरवाढीची ही मालिका थांबेल असे चित्र सध्या तरी दिसत नाही. शहरातील काही सराफ व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन्याच्या दरात आणखी दहा टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी पुरेसे भान ठेवून खरेदी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
गुंतवणुकीबाबत सावधगिरीची गरज
सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनीही सध्या थांबलेले पाहायला मिळत आहे. दरवाढीचा फायदा मिळवण्याची इच्छा असली तरी पुढील स्थितीबाबत अनिश्चितता असल्याने अनेकांनी हात आखडता घेतला आहे. भविष्यात दर आणखी वाढले, तर खरेदी क्षमतेवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
एकूणच, सध्या बाजारात चलबिचल असली तरी सोन्याचा झगमगाट कायम आहे. परंतु या झगमगाटामागे असलेली आर्थिक तगमग सामान्य ग्राहकांच्या खिशाला चटके देणारी ठरत आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


