धुळे दर्पण न्यूज :- शिरपूर तालुक्यात अपघाताचा बनाव करत ट्रकमधील तब्बल ५७४ गव्हाचे पोते लंपास करून सुमारे ९ लाख ३६ हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी धान्य व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून ट्रक चालक, मालक व इतर तीन ते चार जणांविरोधात शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  ही घटना शिरपूर तालुक्यातील दहिवद शिवारात घडली. मध्य प्रदेशातील सेंधवा येथील सदर बाजारातून ट्रक क्रमांक MH 18 BG 8833 पुणे जिल्ह्यातील सनसवाडी येथे गहू घेऊन रवाना झाला होता. ट्रान्सपोर्ट चालक पवन जगदीश कुमावत, ट्रक मालक आकाश प्रकाश बाविस्कर आणि वाहनचालक राहुल संतोष जामरे (सर्व रा. सेंधवा, जुलवानिया) या तिघांवर गहू सुरक्षीत पोहोचवण्याची जबाबदारी होती.

- Advertisement -

  मात्र, दहिवद परिसरात ट्रकचा अपघात झाल्याचा बनाव रचण्यात आला आणि नंतर ट्रकमधील गव्हाचे पोते स्थानिकांनी चोरून नेल्याचा देखावा केला गेला. धान्य व्यापारी यश अनिल गोयल (वय ३१, रा. महात्मा गांधी मार्ग, सेंधवा) यांनी याबाबत शंका येताच शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.


  त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पवन कुमावत, आकाश बाविस्कर आणि राहुल जामरे यांना अटक केली. चौकशी दरम्यान या तिघांनी गुन्हा कबूल केला असून पोते चोरी करून परस्पर विकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील वसावे, कर्मचारी संतोष पाटील, योगेश खरे, संजय भोई, भूषण पाटील आणि चत्तरसिंग खसावद यांचे पथक करत आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, हा गुन्हा पूर्वनियोजित असून गहू विकून आरोपींनी आर्थिक लाभ मिळवण्याचा कट रचला होता.


  या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलिस तपास अधिक गतीने सुरू आहे. व्यापाऱ्यांची विश्वासार्हता आणि माल वाहतूक व्यवस्थेवर या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -