धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्ह्यात यंदा पावसाळ्याची चाहूल नेहमीपेक्षा लवकर लागली असून, रविवारी आणि सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १ जूनपर्यंत शहरात नैऋत्य मान्सून दाखल होणार असून, येत्या दोन दिवसांसाठी म्हणजेच २७ व २८ मे रोजी "यलो अलर्ट" जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

मान्सूनची लवकर एन्ट्री

  हवामान विभागाने यंदा मान्सूनच्या लवकर आगमनाचा अंदाज वर्तवला होता. याअंतर्गत २५ मे रोजी कोकणात नैऋत्य मान्सून दाखल झाला असून, अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि हिंद महासागरातील द्विध्रुवीय स्थितीमुळे बंगालच्या उपसागरात तापमान वाढले आहे. यामुळेच मान्सून वेगाने पुढे सरकत असून, धुळे जिल्ह्यात तो १ जूनपर्यंत दाखल होणार आहे.


शहरातील उकाड्यानंतर पावसाची सुटका

  शहरात रविवारी व सोमवारी उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. सोमवारी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.५ अंश सेल्सिअस इतके होते. आर्द्रता तब्बल ९२ टक्क्यांवर पोहोचली होती. त्यानंतर दुपारी ४.३० वाजेनंतर अचानक ढगाळ वातावरण झाले आणि सायंकाळी जोरदार पावसाने सुरुवात केली. पावसामुळे शहरातील अनेक भागात विजपुरवठा खंडित झाला.

- Advertisement -
बेटावद व खंबाळे भागात मोठे नुकसान

  शिरपूर तालुक्यातील बेटावद गावात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वाऱ्यामुळे अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडली. काही झाडे थेट विजेच्या तारांवर कोसळल्याने विजपुरवठा खंडित झाला. तर खंबाळे शिवारात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वीज पडल्याने एका म्हशीचा दुर्दैवी मृत्यू झाला.


पुढील दोन दिवस यलो अलर्ट

  हवामान विभागाने २७ व २८ मे रोजी धुळे शहर व जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. या काळात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, सुरक्षित स्थळी थांबावे आणि विद्युत उपकरणांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

- Advertisement -
जूनमध्ये समाधानकारक पावसाचे संकेत

  हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांच्या मते, जूनच्या सुरुवातीला शहरात आणि जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडणार आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार असून, हवामानातील बदल आणि सक्रिय मान्सून यामुळे जूनमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

---

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

सावधगिरीचा इशारा :


• विजेच्या तारांपासून दूर रहा


• झाडांच्या खाली थांबू नका


• शेतकऱ्यांनी यंत्रसामग्री सुरक्षीत ठेवावी

- Advertisement -

• प्रवास करताना हवामानाचा अंदाज घ्या


धुळेकरांनो, आला पावसाळा... आता काळजी घ्या आणि स्वागत करा निसर्गाच्या या जीवनदायी सरींचं!

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -