धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्ह्यात एका ज्येष्ठ पत्रकारावर भरदुपारी जीवघेणा हल्ला होणे ही केवळ धक्कादायकच नव्हे, तर धुळे जिल्ह्यातही गुंडगिरीचा बीड पॅटर्न सुरू झाला आहे का? असा सवाल निर्माण झाला आहे. दै. महाराष्ट्र शोधयात्रा वृत्तपत्राचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार व धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री. मिलिंद बैसाणे यांच्यावर अवधान शिवारातील टोलनाका परिसरात २३ मे रोजी भरदिवसा हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे हल्ल्यानंतर हल्लेखोरांवर कारवाई करण्याऐवजी उलट बैसाणे यांच्याविरोधातच खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने संतप्त भावना उसळल्या आहेत.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
पत्रकार संघाचा संतप्त रोष : एसपी व आमदारांकडे निवेदन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे (एलसीबी) वर्ग करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच बैसाणे यांच्यावर दाखल खोटा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
![]() |
| - Advertisement - |
यावेळी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांची देखील भेट घेऊन प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. आमदार अग्रवाल यांनी तत्काळ जिल्हा पोलिस अधिक्षकांशी संपर्क साधून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे समजते.
दिवसाढवळ्या पत्रकारावर हल्ला, गुन्हा उलट पीडितावरच
२३ मे रोजी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास अवधान टोल नाका परिसरात बैसाणे यांच्यावर चार ते पाच हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर या हल्लेखोरांनीच बैसाणे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्यावरून मोहोदी पोलीस ठाण्यात बैसाणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. हल्लेखोर मोकाट आणि पत्रकाराला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न ही बाब केवळ निंदनीयच नाही, तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा थेट हल्ला मानला जात आहे.
पत्रकार संघटनांचा तीव्र निषेध : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला
या हल्ल्याचा धुळे जिल्ह्यासह राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून, पत्रकार आणि नागरीक एकवटून दोषींना तत्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. बैसाणे यांच्यावर दाखल खोटा गुन्हा मागे घेऊन, हे प्रकरण एलसीबीकडे वर्ग करावे, अशी मागणी आज दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
![]() |
| - Advertisement - |
एसपी श्रीकांत धिवरे यांना निवेदन देताना धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, प्रांतिक सदस्य प्रकाश शिरसाठ, माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, जीवन शेंडगे, मनिष मासुळे, विरेंद्र मोरे, रविंद्र नगराळे, नरेश रावताळा, देवेंद्र पाटील, पंकज पाटील, दीपक पाटील, दीपक वाघ, संजय पाटील, गोरख गर्दे, योगेश पाटील, मधूकर मिस्तरी, शांताराम अहिरे, जमील शाह, अकिल शाह, अनिस खाटीक, पुरुषोत्तम पाटील, दिनेश निकुंभ, आकाश सोनवणे, दीपक शिंदे, पुरुषोत्तम गरुड, अजिंक्य देवरे, राकेश गाळणकर, दिग्विजय गाळणकर, फैसल शाह, नुरखान पठाण, फरीद अन्सारी, सागर खरात, पंकज फुलपगारे, सुभाष वाघ आदी पत्रकार उपस्थित होते.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
गुन्हेगारांना अभय आणि पत्रकारांवर खोटे गुन्हे : ही कुठली लोकशाही?
गुन्हेगार खुलेआम दहशत माजवत असताना पत्रकारांवरच खोटे गुन्हे दाखल करणे ही लोकशाहीची गळचेपी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकारिता आणि सामाजिक न्याय या तिन्हींच्या मुळावर घाव घालणारा हा प्रकार असून, याला सरकार आणि प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनू शकतो.
ही घटना धुळेपुरती मर्यादित नसून, राज्यभरातील पत्रकारांच्या सुरक्षिततेवरच मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. त्यामुळे या प्रकरणात त्वरीत निष्पक्ष आणि कठोर कारवाई व्हावी, हीच सर्व पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींची मागणी आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



