धुळे दर्पण न्यूज :- लळींग विभागातील लांडोर बंगला परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे निर्माण व हायवेपासून स्मारकापर्यंत डांबरी रस्त्याची मागणी करत ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने वनपरिक्षेत्र उपविभागीय अधिकारी, लळींग विभाग यांना निवेदन सादर करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसंबंधी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

  निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ३१ जुलै १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोर्टाच्या कामानिमित्त लळींग येथील लांडोर बंगला परिसरात आले होते. त्यावेळी पुनाजी अण्णा लळींगकर यांनी बाबासाहेबांना लळींग बंगला रेस्ट हाऊसमध्ये मुक्कामासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी लाखो अनुयायी चार राज्यांतून येथे “भीमस्मृती यात्रा”साठी गर्दी करतात. मात्र या यात्रेच्या मार्गावर असलेल्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून, विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरते. परिणामी अनुयायांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

- Advertisement -

  हा रस्ता वनविभागाच्या आरक्षित क्षेत्रात येतो, या कारणावरून प्रशासनाकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. याशिवाय, “सरपटणाऱ्या प्राण्यांना त्रास होतो” हे कारण पुढे करून रस्त्याचे काम थांबवले जात आहे. मात्र आंबेडकरी समाजाच्या श्रद्धेचा आणि इतिहासाशी निगडित या स्थळाचा विकास करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी करत या संदर्भातील निर्णय १५ दिवसांत घ्यावा, अन्यथा ऑल इंडिया पँथर सेना आणि आंबेडकरी समाजाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

- Advertisement -

या निवेदनप्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये जिल्हाध्यक्ष सागर भाऊ मोहिते, महिला जिल्हा अध्यक्षा अनिता ताई सोनवणे, महिला उपाध्यक्षा पूजा ताई चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष आकाश भाऊ घोडे, शहर कार्याध्यक्ष संघरत्न भाऊ गायकवाड, शहर अध्यक्ष योगेश भाऊ बैसाणे, युवक तालुका अध्यक्ष विशाल भाऊ वाघ, शहर उपाध्यक्ष मनोज भाऊ म्हस्के, युवक तालुका उपाध्यक्ष सुनील भाऊ वानखेडे तसेच सामाजिक कार्यकर्त्या मायाताई पानपाटील आदींचा समावेश होता.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

प्रशासनाने त्वरित योग्य तो निर्णय घेऊन लांडोर बंगला परिसराचा ऐतिहासिक व सामाजिक विकास साधावा, अशी आंबेडकरी समाजाची एकमुखी मागणी आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम