भारतीय जवानांच्या शौर्याला धुळेकरांचा अभूतपूर्व सलाम!
आ. अनुपभैय्यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा ध्वज यात्रा उत्साहात पार
११११ फूट लांब तिरंगा ध्वज उंचावत, देशभक्तीच्या घोषणांनी शहरात गजर
धुळे दर्पण न्यूज :- पहलगाम (जम्मू काश्मीर) येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला ठोस प्रत्युत्तर देत भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे आणि हवाई तळ उद्ध्वस्त करणारे ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले. या शौर्यपूर्ण कृतीला सलाम करण्यासाठी व भारतीय जवानांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे, हे सांगण्यासाठी आज धुळे शहरात भव्य तिरंगा ध्वज यात्रा काढण्यात आली. आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत ११११ फूट लांब तिरंगा ध्वज हाती घेत धुळेकरांनी देशप्रेमाची अनोखी भावना व्यक्त केली.
![]() |
| - Advertisement - |
शहरातील अग्रसेन चौकात सकाळी या यात्रेला सुरुवात झाली. माजी सैनिकांच्या उपस्थितीत, पोलिस बँडच्या देशभक्तिपर सुरावटींनी वातावरण भारून गेले होते. या यात्रेत जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी सैनिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने धुळेकर सहभागी झाले होते.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
देशभक्तीचा महासागर
तिरंगा यात्रा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पाचकंदील, जमनालाल बजाज चौक, फुलवाला चौकमार्गे महात्मा गांधी पुतळा येथे पोहोचली. "ऑपरेशन सिंदूर - पराक्रम अभूतपूर्व", "सेना के सन्मान में, हम सब हैं मैदान में", अशा घोषणांनी आणि फलकांनी शहराचे वातावरण देशभक्तीमय झाले होते. पुरुष, महिला, युवक, वृद्ध अशा सर्वांनी यात सहभाग नोंदवला.
![]() |
| - Advertisement - |
माजी सैनिकांचा सत्कार व सन्मान
महात्मा गांधी पुतळाजवळ समारोपप्रसंगी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. आमदार अनुप अग्रवाल, एसपी श्रीकांत धिवरे, आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या हस्ते मेजर निलेश पाटील, राजूलाल चौधरी, भीमराव बोरसे, संतोष चौधरी यांच्यासह अनेक माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने समारोप झाला.
जनतेचा जल्लोष, जवानांचा गौरव
या पदयात्रेत भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. सुशील महाजन, रवी बेलपाठक, विजय पाच्छापूरकर, माजी महापौर जयश्री अहिरराव, अल्पा अग्रवाल, प्रतिभा चौधरी, मायादेवी परदेशी यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते. सर्वपक्षीय सहभाग, सर्वधर्मीय नागरिकांची उपस्थिती, आणि देशासाठी एकवटलेली जनशक्ती हे या यात्रेचे वैशिष्ट्य ठरले.
“धुळेकरांनी दाखवलेली देशभक्ती प्रेरणादायी” — आ. अनुपभैय्या अग्रवाल
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
“भारतीय जवानांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी, आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत हे दाखवण्यासाठी धुळेकरांनी जो उस्फूर्त प्रतिसाद दिला, तो निश्चितच प्रेरणादायी आहे. देशासाठी एकत्र येण्याची ही भावना सर्वत्र रुजावी, हीच अपेक्षा.” — आ. अनुप अग्रवाल, आमदार, धुळे शहर
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम



