धुळे दर्पण न्यूज :- धुळे महानगरपालिका हद्दीतील वलवाडी, महिंदळे यांसह एकूण दहा गावांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र विकास पॅकेजची नितांत आवश्यकता असून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी केले. वलवाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या हस्ते नगरोत्थान योजना २०२४-२५ अंतर्गत वलवाडी प्रभाग क्रमांक १ मधील बोरसेनगर येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण तसेच खासदार निधीतून चंद्रोदय कॉलनीतील रस्ते काँक्रिटीकरण आणि बंदिस्त गटार बांधकाम अशा एकूण ५५ लाख रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. शोभा बच्छाव होत्या. या वेळी चंद्रोदय कॉलनी, गोंदूर विमानतळ रस्ता, वलवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी बोलताना आमदार पाटील म्हणाले, “महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या वलवाडी, महिंदळे, गोंदूर, आझादनगर, ममुराबाद, मल्हारपुरा, सांगवी, नरसिंग टेकडी, बाभळे आणि देगाव या दहा गावांचा मूलभूत सुविधांसह सर्वांगीण विकास अत्यंत आवश्यक आहे. या भागांतील रस्ते, गटारी, पथदिवे, खुल्या जागांचा विकास, आरोग्य सुविधा यासाठी मी अनेक कामे मंजूर करून घेतली आहेत. मात्र या सर्व गावांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्र पॅकेजच हवे.”
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनीही आपल्या मनोगतातून जनतेच्या प्रश्नांची सखोल माहिती घेत विधायक संवाद साधला. माजी सरपंच भटू चौधरी, छोटू चौधरी, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील तसेच विविध पक्षांचे स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]() |
| - Advertisement - |
गुणवत्तेवर भर, ठेकेदारांनी वेळेत काम पूर्ण करावे – खासदार बच्छाव
खासदार डॉ. शोभा बच्छाव म्हणाल्या, “महानगरपालिकेच्या विस्तारित हद्दीतील गावांचा विकास प्राधान्याने होणे गरजेचे आहे. या भागांसाठी स्वतंत्र पॅकेज मंजूर करून घेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. काम करताना कोणतीही तडजोड न करता ठेकेदारांनी दर्जेदार आणि वेळेवर कामे पूर्ण करावीत. माजी मंत्री स्व. रोहिदास पाटील यांनी अक्कलपाडा प्रकल्पाची दूरदृष्टी ठेवून घेतलेला निर्णय धुळे शहराच्या पाणी समस्येवर समाधानकारक ठरला. त्याच धर्तीवर आपणही या दहा गावांचा उज्वल आणि सर्वांगीण विकास साधू.”
या कार्यक्रमाद्वारे स्थानिक नागरिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. स्वतंत्र पॅकेज मिळाल्यास मनपा हद्दीतील गावांचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
