> सदर : दृष्टिकोन
*भाजपसमोर आव्हान वाचाळवीरांचे?*
*लेखिका : सीमाताई मराठे,*
धुळे. मो. 9028557718
धुळे दर्पण न्यूज :- देशातील सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्ष सध्या एका विचित्र राजकीय पेंचात सापडलेला आहे. एकीकडे राममंदिर, विकास, आत्मनिर्भर भारत, वसुधैव कुटुंबकम् यांची घोषणाबाजी; आणि दुसरीकडे पक्षाच्या मंचावर, रॅलीत, आणि सोशल मीडियाच्या चौकात उभे राहून 'देशप्रेम' नावाच्या गोंडस संकल्पनेखाली विष ओकणारे वाचाळवीर. ह्या वाचाळवीरांची यादी आता एवढी मोठी झाली आहे की ती डोंगराइतकी उंच आणि चंद्रावरील खड्ड्याइतकी खोल झाली आहे. प्रश्न असा की, यांना कोणी थांबवणार आहे का? की पक्षाचं मौन हेच आता अधिकृत धोरण बनलं आहे?
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
जणू काही राज्यकर्त्यांच्या मूळ धोरणात वाचाळपणा ही एक 'अघोषित पदवी' असल्यासारखा प्रकार रूढ झाला आहे. सभागृहात, जाहीर सभा-मोर्च्यांमध्ये, आणि हल्ली सोशल मीडियावर तर चढाओढ लागलेली आहे, कोण कोणाच्या प्रतिष्ठेवर अधिक चिखल फेकतो. कोण अधिक अवमानकारक बोलतो, कोण अधिक कडवट भाषा वापरतो आणि मुख्य म्हणजे, कोण पक्षाच्या नावाचा झेंडा अधिक बेभानपणे फडफडवतो! भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या संदर्भात ही गोष्ट विशेष महत्त्वाची होते. कारण जो पक्ष ‘शिस्त’, ‘संस्कार’ आणि ‘गंभीर राष्ट्रवाद’ यांचे ब्रीदवाक्य मिरवतो. त्याच पक्षाच्या व्यासपीठावर काही वाचाळवीर अशा रीतीने तोंडसुख घेतात, की त्यांना लहानपणी गाईचे दूध पाजलेलं आहे की, विषारी नागिणीचं? हेच समजत नाही.
![]() |
| - Advertisement - |
![]() |
| - Advertisement - |
ही ‘बोलून दाखवण्याची’ संस्कृती इतकी बिनधास्त झाली आहे की, काहीजण तर आपण जे काही बोलतो तेच ‘लोकांचे खरे मनोगत’ असल्याच्या भ्रमात आहेत. हे बोलणे म्हणजे ‘जनतेची भाषा’ आहे असं भासवत ते वादविवादाच्या पातळीवरून सरळ अपशब्दांच्या पातळीवर उतरतात. गल्लीतल्या चहावाल्याच्या गप्पा जशा एका क्षणात ‘तो खालचा आणि आपण वरचा’ याच्यात विघटन निर्माण करतात. तसाच काहीसा परिणाम हे वाचाळवीर ‘चाय पे चर्चा’च्या जोडीला समाजावर करत आहेत. लोकांच्या मनात आता प्रश्न आहे की या पक्षाचा ‘विचारधारा आणि विकास’ याचा आग्रह खरा आहे की केवळ ‘ध्वनीप्रदूषणातून’ मिळणारा राजकीय लाभ?
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
ही प्रवृत्ती एकट्या एखाद्या नेत्यानं आणलेली नाही. ती पक्षसंस्कृतीच्या एका अविचारी टप्प्याचं प्रतीक बनली आहे. लोकशाहीत वाणीला स्वातंत्र्य असतं, हे खरे. पण त्या वाणीचं समाजमनावर काय परिणाम होतो याचा तरी तरी विचार करायला हवा. एखादा वाचाळवीर विरोधकांना ‘शत्रू’ म्हणतो, तर दुसरा धर्मावरून थेट देशविघातकतेचा आरोप करतो. अशा काळोख्या विधाने ऐकल्यावर आपल्याला वाटतं की ही भाषणं संसदेतली नसून एखाद्या व्हॉटस्ॲप ग्रुपमधली आहेत. त्यात भडकवणं, चिथावणं, उथळ अस्मिता आणि पुराव्याशिवाय लावण्यात येणारे लेबल्स – ही सर्व लक्षणं ‘राजकीय व्यासपीठा’ची झाली आहेत. आणि दुर्दैव म्हणजे जनतेच्या मनात ‘राजकारण म्हणजेच हे असं असतं’ हे रूजायला लागलं आहे.
भाजपने जर या वाचाळवीरांना वेळेत आवर घातला नाही, तर उद्या हीच झिंग पक्षाला वेडावणं ठरेल. कारण शब्द ही फक्त भाषा नाही, ती मूल्यांची वाहक असते. जेव्हा पक्षाचे प्रवक्ते किंवा लोकप्रिय नेते टोकाची वक्तव्यं करतात, तेव्हा ते केवळ एक मत मांडत नाहीत. ते एक विचार आणि एक वृत्ती समाजावर लादत असतात. ती वृत्ती जर कट्टर, विभाजनकारी आणि नीच असेल, तर जनता थकते. आणि जनता थकल्यावर ती तिरस्कार करते. हेच भाजपच्या बाबतीत हळूहळू घडताना दिसतंय.
पूर्वी ‘विचार’ हे भाजपचं बलस्थान मानलं जायचं. आज विचारांच्या नावावर टाळ्या घेणाऱ्या विखारी वक्तव्यांचा उच्छाद माजला आहे. ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ असं एकेकाळचं घोषवाक्य आज ‘गर्व से गाली दो’ इतकं विकृत झालंय. यातून भाजपचं सामाजिक आणि राजकीय भान हरवतंय. खास करून तरुण मतदार, सुशिक्षित मध्यमवर्ग आणि शहरांचं मन हे नुसत्या भावनांनी नाही, तर शब्दांच्या वजनावर निर्णय घेतं. आणि जर त्या शब्दांत हलकेपणा, बेजबाबदारी आणि घमेंड असेल, तर ते मतदार भविष्यात मत देतांना फारसे चुकणार नाहीत.
![]() |
| - Advertisement - |
पक्षाने जर हा वाचाळपणा संयमाने हाताळला नाही, तर पक्षाचं भविष्य ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ ऐवजी ‘क्लिकबेट राष्ट्रवाद’ अशा दिशेने जाईल. आणि मग हे सर्व म्हणजे एक सर्कस होईल, जिथं वाघ पिंजऱ्यात नाही, तर निवडणूक आयोगाच्या सूचनेखाली आहे, आणि जोकरचं मुखवटा घालून वाघासारखे डरकाळ्या फोडणारे गोंधळ घालतात. पण जनता प्रेक्षक नाही ती परीक्षक आहे. तिने जर ठरवलं की पुरे झालं, तर मग वाचाळपणाचा नायक एक क्षणात राजकीय निवृत्तीच्या पायऱ्यांवर ढकलला जाईल.
राजकारण ही शेवटी एक विश्वासाची गोष्ट असते. जर त्या विश्वासावरच शब्दांचा गंज बसू लागला, तर मग भले एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवलेली टोपी कितीही भगवी असो, त्यातली झळाळी हरवतेच. आणि मग नुसते फटकाऱ्यांनी नव्हे, तर मतपेटीतूनही शिक्षा होते. भाजपने हे समजून घेण्याची हीच वेळ आहे. अन्यथा ‘वाचाळवीर’ ही पदवी उधळणाऱ्यांचे आवाज निवडणुकीच्या रात्रीच्या शांततेत अडखळताना ऐकू येतील. आणि तो आवाज एकट्याचा नसेल, तो संपूर्ण पक्षाच्या आत्मपरीक्षणाचा हुंकार असेल.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |




