धुळे दर्पण न्यूज :- धुळे रेल्वे स्टेशनचा चेहरामोहरा बदलणाऱ्या विविध विकास कामांचं लोकार्पण येत्या २२ मे रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाबाबत माहिती देताना स्टेशन प्रबंधक सुरेश जाधव यांनी रविवार, १८ मे रोजी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  सन २०२३ मध्ये सुरू झालेल्या या विकासकामांची पूर्तता ऑगस्ट २०२४ मध्ये झाली असून, या प्रकल्पासाठी रेल्वे विभागाकडून एकूण ९ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी मिळवण्यात आला होता. या निधीतून धुळे रेल्वे स्थानकावर आधुनिकतेच्या दिशेने अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

  स्टेशन प्रबंधक जाधव यांनी सांगितले की, स्टेशनवरील ऑफिसर्स दालनांचे नूतनीकरण, स्टेशन प्रबंधकांचे कार्यालय, महिलांसाठी व पुरुषांसाठी जनरल टॉयलेट्स, तसेच दिव्यांगांसाठी स्वतंत्र शौचालय यांचा समावेश या कामात आहे. प्लॅटफॉर्मवर नवीन शेड्स उभारण्यात आले असून, क्लिनिंग टाइल्स बसवून संपूर्ण परिसर स्वच्छ व आकर्षक करण्यात आला आहे.


प्रवाशांसाठी नव्या सुविधा:

धुळे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात आली आहे. प्रवाशांच्या आरामासाठी भव्य गार्डनची निर्मिती करण्यात आली असून, सर्क्युलेटिंग एरियामध्ये डेकोरेटिव्ह लाईट्स व इलेक्ट्रिक झुंबर लावण्यात आले आहेत. नव्याने अलाउंसिंग सिस्टीम बसवण्यात आली असून, ट्रेन इंडिकेटर्सही उभारण्यात आले आहेत.



प्रवेशद्वार आणि नावफलक आकर्षण ठरणार:

स्टेशनच्या प्रवेशद्वाराची भव्य उभारणी करण्यात आली आहे. याशिवाय ‘धुळे रेल्वे स्टेशन’ या नावाचा नवीन अत्याधुनिक फलकही लावण्यात आला आहे, जो प्रवाशांचे लक्ष वेधून घेतो.



"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

पाचोरा-जामनेर मिनी ट्रेनचे वैशिष्ट्य:

धुळे स्थानकावर पाचोरा-जामनेर मिनी ट्रेनच्या बोगीचा उपयोग करून आगळीवेगळी तिकीट बुकिंग आणि जनरल तिकीट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ही प्रणाली प्रवाशांसाठी एक नवलाईचा अनुभव ठरणार आहे.


‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत काम:

या सर्व कामांची अंमलबजावणी ‘अमृत भारत स्टेशन स्कीम’ अंतर्गत करण्यात आली आहे. देशभरातील रेल्वे स्थानकांना नव्या रूपात विकसित करण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची ठरत आहे.

- Advertisement -

लोकार्पण समारंभाची तयारी पूर्ण:

या भव्य विकासकामांचं लोकार्पण २२ मे २०२५ रोजी सकाळी ९ ते १० दरम्यान ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आजी-माजी खासदार, आमदार, विविध लोकप्रतिनिधी, निमंत्रित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


स्टेशन प्रबंधक सुरेश जाधव यांनी धुळेकर नागरिकांनीही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. धुळे रेल्वे स्थानकाचा हा नवा अवतार शहरासाठी गौरवाचा विषय ठरत असून, नागरिकांमध्ये याविषयी मोठ्या प्रमाणावर उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -