धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्ह्यातील गुलमोहर विश्रामगृहात सापडलेल्या साडेएक कोटींपेक्षा अधिक रोकड प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या पत्रकार परिपत्रकातून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सर्वत्र चर्चेत असलेल्या या कथित खंडणी प्रकरणाची सध्या "तपास" सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली असली तरी अद्याप एकाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.

- Advertisement -


गुन्हा नोंदवण्यास पोलीस टाळाटाळ का करत आहेत?


अनिल गोटे यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांना फोन व एसएमएसद्वारे या घटनेची माहिती दिली, तेव्हा कोणतीही तत्काळ कारवाई झाली नाही. त्यांनी रात्री २८ वेळा फोन केले, परंतु कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी रात्री ११.३० च्या सुमारास पोलीस अधिकाऱ्यांनी रुम नंबर १०२ चं कुलूप इलेक्ट्रिक कटरने तोडून तपास केला, पण त्याआधी ना पंचनामा झाला, ना फिंगरप्रिंट्स घेतले गेले.


तपास म्हणजे नाटक?


गोटे यांच्या मते, तपासाऐवजी संपूर्ण प्रक्रिया "तपासाचा देखावा" होती. कोणताही FIR नसताना, तपास कसा शक्य आहे? हे कोणत्याही कायद्यानुसार ग्राह्य धरले जाणार नाही. रक्कमेच्या मूळ स्रोताचा मागोवा घेण्यासाठी प्रेसकट नोटांवरील सीरिअल नंबर तपासले जाऊ शकले असते, पण तीही प्रक्रिया हेतुपुरस्सर टाळण्यात आली.


मुख्यमंत्री कार्यालयाकडून थेट हस्तक्षेप?


या प्रकरणाचा तपास थेट मुख्यमंत्री कार्यालयातून नियंत्रणात घेतल्याची माहितीही सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे सामान्य नियम, कायदे, पोलीस प्रक्रियेला बगल दिल्याचे स्पष्ट होत आहे. गोटे यांनी थेट फडणवीस यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, ही संपूर्ण कारवाई म्हणजे महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे.


अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्याची घोषणा


भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी एका चर्चासत्रात गोटे यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केल्यामुळे, अनिल गोटे यांनी त्यांच्याविरुद्ध धुळे न्यायालयात अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्याची घोषणा केली आहे. “मी पुराव्याशिवाय कधीच आरोप करत नाही,” असे सांगत त्यांनी चव्हाण यांना थेट आव्हान दिले आहे.

- Advertisement -


गोटे यांचा इशारा


“या प्रकरणात कोणत्याही रोख रक्कमेची मागणी न करता संबंधितांना शिक्षा व्हावी यासाठीच मी न्यायालयात खटला भरतोय,” असे सांगत गोटे यांनी भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच, त्यांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभवाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, “मुख्यमंत्र्यांनाही राजीनामा द्यावा लागतो, जर सत्य जनतेपुढे मांडले गेले तर.”



(ही बातमी माजी आमदार अनिल गोटे यांच्या अधिकृत पत्रकावर आधारित आहे.)