धुळे दर्पण न्यूज :- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा पहिला निर्णय अत्यंत सकारात्मक व दिलासा देणारा ठरला आहे. जिल्ह्यातील खंडलाय (ता. धुळे) येथील केवळ तीन वर्षीय चि. शिव योगेश पाटील या बालकाच्या हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी सादर करण्यात आलेले प्रकरण अवघ्या पाच दिवसात मंजूर करून त्याच्यावर त्वरीत उपचार सुरू करण्यात आले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चि. शिव यास उजव्या बाजूस जन्मतः हर्निया होता. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्याच्या पालकांना उपचारासाठी खर्च परवडणारा नव्हता. अशा वेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत मिळवण्यासाठी त्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यता कक्षाकडे अर्ज सादर केला.

- Advertisement -

  त्यानंतर डॉ. योगेश पाटील, कपिल पिवाल, प्रमोद बागूल यांनी तात्काळ संबंधित कागदपत्रांची पूर्तता करून संपूर्ण प्रकरण मंजुरीस पाठवले. अत्यंत जलद कार्यवाही करत अवघ्या पाच दिवसांत या प्रकरणाला मंजुरी मिळवून देण्यात आली. परिणामी, निरामय हॉस्पिटल, धुळे येथे चि. शिव याच्यावर त्वरित शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली आणि ती यशस्वी ठरली.

  हे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे, येथील मंजूर झालेले पहिलेच प्रकरण असून या उपक्रमाचा प्रारंभ अत्यंत सकारात्मक पद्धतीने झाला आहे. या प्रक्रियेस राज्य कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, डॉ. स्वानंद सोनार (वैद्यकीय समन्वयक वर्ग-१, मुंबई), डॉ. रितेश पाटील (राज्य समन्वयक) आणि डॉ. मनोज विसपुते (जिल्हा समन्वयक, धुळे) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

  राज्यात १ मे २०२५ पासून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत धुळे जिल्ह्यातील गरजू रुग्णांना जलद आणि पारदर्शक पद्धतीने आर्थिक मदत मिळवून देण्याचे कार्य सुरु आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या सकारात्मक उदाहरणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व गरजू रुग्णांनी वैद्यकीय उपचारांसाठी मदतीची आवश्यकता भासल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन या कक्षाचे अध्यक्ष डॉ. योगेश पाटील यांनी केले आहे.

_________________________________________

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -