धुळे दर्पण न्यूज :- शहरातील बहुचर्चित स्वस्तिक चित्रपट गृहाच्या जागेच्या खरेदीखतावरून मोठा वाद निर्माण झाला असून या व्यवहारामध्ये खरेदीदारांनी खोटी कागदपत्रे तयार करून बनावटपणे व्यवहार केल्याचा गंभीर आरोप मूळ मालकांचे वारसदारांकडून करण्यात आला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

दि. २४ जून २०२५ रोजी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमती रेखा योगेश शहा यांनी हे धक्कादायक आरोप करत सविस्तर पुरावे सादर केले.


  रेखा शहा यांनी सांगितले की, “सिटी सर्व्हे नं. १४६६/४ व १४६६/५ मधील आमच्या मालकीच्या स्वस्तिक चित्रपट गृहाच्या इमारतीचा आणि बखळ जागेचा बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत करण्यात आले आहे. खरेदीखत दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी झाले असून त्यास जोडलेली सर्व कागदपत्रे खोटी असून खरेदीदारांनी नगरपालिकेतील तसेच सिटी सर्व्हे कार्यालयातील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून त्यातून हा बनावट व्यवहार उभा केला.”

- Advertisement -

बनावट उतारे, चुकीचे क्षेत्रफळ, खोटी नावे - एकंदर धांदलीच

श्रीमती शहा यांनी सादर केलेल्या पुराव्यांनुसार:

  • खरेदीखतास जोडलेले सिटी सर्व्हे १४६६/१ चे उतारे बनावट आहेत. एका उताऱ्यात दि. २५/०३/२०२५ रोजीची नोंद असून त्या आधीच नोंदवलेली वारसांची नावे सुद्धा त्या पृष्ठावर दिसतात, जे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे.

  • आणखी एक संगणकीय उतारा, जो ०२/१२/२०११ रोजीचा दाखवण्यात आला आहे, तो ‘पैकी क्षेत्र’ या उल्लेखाविना आहे, आणि त्यात वारसांची खोटी नावे जोडण्यात आली आहेत.

  • महानगरपालिकेच्या मालमत्ता रेकॉर्डमध्ये सुद्धा प्रदीप हिरालाल शहा यांचे नाव मालक म्हणून दाखवण्यात आले आहे, जे वस्तुस्थितीनुसार चूक आहे. मालमत्ता मूळत: चंद्रावतीबाई नेमीचंद शहा यांच्या नावावर होती, व संबंधित नंबरावर त्याच नावाची नोंद आहे.

  • एक बनावट नकाशा तयार करून त्यात १४६६/१, १४६६/४ व १४६६/५ या स्वतंत्र मिळकतींचा गोंधळ घालण्यात आला आहे. इंजिनीअर नवीन कोठावदे यांनी हे नकाशे कोणत्या आधारावर तयार केले, याबाबत चौकशी होणे आवश्यक आहे.

  • मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी सुद्धा चुकीच्या क्षेत्रफळाच्या आधारावर विना पुराव्याचा अभिनिर्णय दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

संपूर्ण व्यवहार संशयास्पद, गुन्हा दाखल करण्याची मागणी

  श्रीमती रेखा शहा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट मागणी केली की, “खरेदीदारांनी बनावट कागदपत्रे तयार करून मिळकत हडपण्याचा प्रयत्न केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून खरेदीदार, विक्रीदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. आम्ही यापूर्वी सिटी सर्व्हे कार्यालयास तसेच जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी तक्रारी दिल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष करून खरेदीदारांची नावे दि.०८ मे २०२५ रोजी बेकायदेशीरपणे नोंदविण्यात आली.”

- Advertisement -

पुरावे पत्रकार परिषदेत सादर

पत्रकार परिषदेत कागदपत्रे सादर केले

  या पत्रकार परिषदेत खरेदीखतात जोडलेली विविध पाने, संगणकीय उतारे, नकाशे, नळपट्टी आणि घरपट्टीच्या बनावट पावत्या, महानगरपालिकेचे रेकॉर्ड, वडिलोपार्जित मिळकतीच्या मूळ पत्रिका आदी पुरावे रेखा शहा यांनी सादर केले. त्यावरून संपूर्ण व्यवहारात खूप मोठा गैरव्यवहार झाल्याचे दिसते.

जनहितार्थ विनामूल्य प्रसिद्धीस विनंती

  पत्रकार परिषदेनंतर श्रीमती रेखा शहा यांनी सर्व माध्यमांना विनंती केली की, “हा प्रकार फक्त आमच्यापुरता मर्यादित नाही तर भविष्यात इतर नागरिकांनाही अशा प्रकारच्या बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून फसवले जाऊ शकते. त्यामुळे जनजागृती आणि न्यायासाठी या प्रकरणाला प्रसारमाध्यमांनी प्राधान्य द्यावे.”


धुळे दर्पण

मुख्य संपादक : सैय्यद सानिल

📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -