धुळे दर्पण न्यूज :- राज्यातील राजकारणात मोठे भूकंप घडवणारे 'धक्का तंत्र' आता उत्तर महाराष्ट्रातही जोर धरताना दिसत आहे. धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे नेते आणि माजी आमदार कुणाल पाटील भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत असून, लवकरच ते कमळ चिन्ह हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या संभाव्य पक्षांतराने केवळ धुळे काँग्रेसलाच नव्हे, तर संपूर्ण खान्देशातील काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
भाजपचे 'धक्का तंत्र' सक्रिय
भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण सध्या संपूर्ण राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या (ठाकरे गट) नाराज नेत्यांना आपल्या गोटात खेचण्यासाठी अघोषित मोहीम राबवत आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच कुणाल पाटील यांनी रवींद्र चव्हाण यांची रायगड निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.
काँग्रेससाठी 'घरभेदी'चा धोका
कुणाल पाटील हे काँग्रेसचे राज्य कार्याध्यक्ष असून, त्यांचे वडील रोहिदास पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री होते. गांधी घराण्याचे निकटवर्तीय असलेल्या रोहिदास पाटील यांचं कुटुंब काँग्रेसचा बालेकिल्ला मानलं जातं. त्यामुळे कुणाल पाटील यांचं भाजपमध्ये जाणं म्हणजे काँग्रेससाठी एका 'घरभेदी'च्या स्वरूपात पाहिलं जात आहे.
![]() |
| - Advertisement - |
स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर मोठा राजकीय उलथापालथ?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सगळ्याच पक्षांनी सुरू केली आहे. अशावेळी कुणाल पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याने पक्षांतर केल्यास, भाजपला केवळ धुळे ग्रामीणमध्येच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात मोठा फायदा होऊ शकतो. काँग्रेसची साखळी तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव निर्णायक?
धुळे ग्रामीणमधून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कुणाल पाटील यांचा भाजपचे युवा उमेदवार राम भदाणे यांनी ६६ हजार मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली होती. या पराभवानंतरच कुणाल पाटील यांनी भविष्यातला मार्ग बदलण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.
काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण
कुणाल पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे धुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीचे आणि संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, अनेकजण आपली पुढची वाटचाल काय असेल याबाबत निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
अधिकृत घोषणा अद्याप नाही
दरम्यान, कुणाल पाटील यांनी किंवा भाजपकडून अद्याप त्यांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या प्रवेशाची तयारी पूर्ण झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला जाणार आहे.
![]() |
| - Advertisement - |




