मे महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावून धुळेकरांना काहीसा दिलासा दिला होता. त्यानंतर जूनमध्ये समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवला गेला होता. मात्र, जूनचा अर्धा महिना उलटूनही जोरदार पावसाने शहरात हजेरी लावलेली नाही. यंदा जूनमध्ये फक्त दोनच वेळा पावसाची नोंद झाली असून, ७ जून रोजी ४.८ मिमी आणि १२ जून रोजी २५.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर पावसाचा मागमूसही नाही.
हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सध्या ३० अंश सेल्सिअस आहे. या तापमानामुळे समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये आर्द्रता अधिक असून, त्याचा परिणाम म्हणून शहरात उकाडा वाढला आहे. तसेच हवेचा दाब वाढल्याने मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रवास खोळंबल्याने पावसाचे आगमन लांबले आहे.
![]() |
| - Advertisement - |
शुक्रवारी शहरातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस होते, जे यंदाच्या जूनमधील सर्वाधिक तापमान होते. त्यानंतर शनिवारी तापमानात घट होऊन ते ३६ अंशांवर आले. मात्र आर्द्रता वाढल्याने उकाडा कायम राहिला. गेल्या तीन दिवसांपासून आर्द्रतेचे प्रमाण ९२ टक्के असल्याने उष्माघाताची शक्यता अधिक वाढली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी
गेल्या वर्षी जून महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये शहरात भरपूर पावसाची नोंद झाली होती. ६ जून २०२४ रोजी ४६ मिमी, ८ जूनला ११ मिमी, आणि ९ जूनला ६५ मिमी पाऊस पडला होता. यंदा या तुलनेत पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. तापमानाच्या बाबतीतही यंदा काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसवर गेले होते, तर यंदा ४० अंशांपर्यंत मर्यादित राहिले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
पुढील काही दिवस महत्त्वाचे
हवामान विभागाकडून येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हवामानातील अनिश्चितता पाहता पावसासाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी योग्य काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि गरज नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.


