धुळे दर्पण न्यूज :- तालुक्यातील लामकानी शिवारातून कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात असलेली गुरे शुक्रवारी पहाटे सोनगीर पोलिसांच्या धडक कारवाईत पकडण्यात आली. या प्रकरणात ट्रकमधून २१ गुरे जप्त करण्यात आली असून त्यामध्ये चार मृत गायींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना पाहताच तिघांनी ट्रक सोडून अंधारात पलायन केले. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
ट्रकचा पाठलाग करत कारवाई
गो रक्षकांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कत्तलीसाठी गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच सोनगीर पोलिसांनी पहाटेपासूनच तपासणी सुरू केली होती. पहाटे सुमारास एक ट्रक (एमएच १८ बीजे ८२८२) संशयास्पदरीत्या भरधाव वेगाने जाताना आढळला. पोलिसांनी ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने त्याकडे दुर्लक्ष करून वेग वाढवला. यानंतर पोलिसांनी तत्काळ पाठलाग करत ट्रक अडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
![]() |
| - Advertisement - |
२१ गुरे, चार मृत गायी; १०.६० लाखांचा मुद्देमाल
ट्रक अडविल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये एकूण २१ गुरे आढळली, त्यापैकी चार गायी मृत अवस्थेत होत्या. पळून गेलेल्या तिघांविरोधात सोनगीर पोलिस ठाण्यात अज्ञात म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकसह गुरांची एकूण किंमत सुमारे १० लाख ६० हजार रुपये असून, संबंधित गुरे सुरक्षितपणे स्थानिक गोशाळेत पाठवण्यात आली आहेत.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
गुर तस्करी प्रकरणात हद्दपारीची कारवाई
दरम्यान, जिल्ह्यात गुर तस्करी प्रकरणात पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. गुरुवारी शहरातील आठ संशयितांना चार दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी शिरपूरमधील चार जणांच्या टोळीला संपूर्ण एका वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
या टोळीत जाकीर हुसेन अब्दुल माजिद तेली (वय ५१), बबलु माजिद तेली (वय ३४, दोघे रा. आदर्श नगर), इम्रान खान माजिद खान (वय ३५, रा. कब्रस्तानजवळ), शाहरुख शरीफ तेली (वय २४, रा. लोहार गल्ली, दत्त टॉकीज जवळ) यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अमळनेरमध्ये हद्दपारीच्या आदेशानुसार नेऊन सोडले आहे.
पुढील तपास सुरू
या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सोनगीर पोलीस करत असून, पळून गेलेल्या तिघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. जिल्ह्यात गुर तस्करी, कत्तलीसाठी वाहतूक अशा गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून कडक पावले उचलली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

.jpg)