धुळे दर्पण न्यूज :- शहरातील कमलाबाई हायस्कूल परिसरात शुक्रवारी सायंकाळी नायब तहसीलदार विश्वनाथ जगन्नाथ चौधरी यांच्यावर अज्ञात कारणावरून हल्ला करण्यात आला. या घटनेने संपूर्ण महसूल विभागात खळबळ उडाली आहे. आरोपी अ‍ॅड. प्रवीणकुमार परदेशी यांनी चौधरी यांना अडवून शिवीगाळ करत दमदाटी केली आणि हातघाईवर येत त्यांना मारहाण केली. या मारहाणीत चौधरी जखमी झाले असून त्यांच्या अंगावरील शर्ट देखील फाटल्याची माहिती समोर आली आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

घटनेनंतर जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, शहरातील अनेक महसूल कर्मचारी धुळे शहर पोलिस ठाण्याच्या आवारात जमले होते. त्यांनी एकमुखीपणे या हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

- Advertisement -

या घटनेनंतर महसूल कर्मचाऱ्यांच्या संघटनेने तात्काळ जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात, हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, महसूल कर्मचाऱ्यांना कार्यस्थळी सुरक्षा देण्यात यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

विश्वनाथ चौधरी हे सध्या जुन्या प्रशासकीय संकुलातील रेकॉर्ड ऑफिसमध्ये कार्यरत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, कुळवहिवाटीच्या कागदपत्रांवरून झालेल्या वादातून ही धक्कादायक घटना घडली. ही घटना केवळ चौधरी यांच्यावरचा हल्ला नसून संपूर्ण प्रशासनावरच होणारा दबाव असल्याचे महसूल कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

याआधीही अशाच प्रकारची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. ग्रामीण तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्यानंतर महसूल कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचे कामबंद आंदोलन पुकारले होते. त्यामुळे यावेळीही तीव्र आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही.

या घटनेचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपी अ‍ॅड. परदेशी यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे शहर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, शासकीय कामकाजात अडथळा आणणे, सरकारी अधिकारी मारहाण करणे यासारख्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण घटनेमुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम