धुळे दर्पण न्यूज :- खान्देशातील राजकारणात एक मोठी राजकीय घडामोड घडली असून काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी आमदार कुणाल पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. त्यांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा रविवारी त्यांच्या कार्यालयाकडून करण्यात आली असून, येत्या १ जुलै रोजी दुपारी २ वाजता मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात त्यांचा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  या सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. यासोबतच खान्देशातील भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्तेही या सोहळ्याला उपस्थित राहतील.

- Advertisement -

  दरम्यान, शनिवारी धुळे येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कुणाल पाटील यांनी त्यांच्या भावना मांडत पक्ष बदलाचे संकेत दिले होते. मात्र, तेव्हाच त्यांनी कार्यकर्त्यांना निर्णय दुसऱ्या दिवशी कळवण्याचे सांगितले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात सस्पेन्सचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारी दुपारी त्यांच्या कार्यालयातून अधिकृत घोषणा झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना "चलो मुंबई" असा संदेश पाठवण्यात आला असून, अनेक कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होण्याच्या तयारीत आहेत.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  दुसरीकडे, धुळे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे महानगरप्रमुख रणजित भोसले यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र, संपर्क साधल्यावर भोसले यांनी अशा चर्चांना पूर्णविराम देत आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

- Advertisement -

  कुणाल पाटील हे धुळे जिल्ह्यातील एक प्रभावशाली नेते मानले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिल्ह्यात अनेक वेळा भक्कम कामगिरी केली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षांतर्गत नाराजी व्यक्त करत होते. त्यांच्या या निर्णयामुळे धुळेतील काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय इनिंग भाजपसाठी मोठा बूस्टर ठरू शकते, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

  कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी काळात धुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असून, काँग्रेसला नवीन नेतृत्व तयार करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम