धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील रहदारीच्या मुख्य रस्त्यांवर सध्या मोकाट गुरांनी अक्षरशः ताबा घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महत्त्वाच्या चौकांमध्ये ही जनावरे ठिय्या मांडून बसत असल्याने वाहनचालकांच्या हालचालींना अडथळा निर्माण होत असून, दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र, या समस्येचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी, ही मोकाट गुरे आता थेट नागरीकांच्या जीवाशी खेळत आहेत.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  शहरातील पाच कंदील चौक, कमलाबाई हायस्कूल चौक, महात्मा गांधी चौक, सिग्नल चौक, दत्तमंदिर परिसर, बारापत्थर रस्ता, तहसील कचेरी व महापालिकेसमोरचे रस्ते आदी प्रमुख ठिकाणी ही गुरे ठाण मांडून बसत असून, सकाळपासून रात्रीपर्यंत रस्त्यांवर मोकळेपणाने संचार करत असतात. या जनावरांमुळे विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा गुरे अचानक रस्त्यावर येत असल्याने वाहने नियंत्रणाबाहेर जातात आणि अपघात घडतात.

- Advertisement -

महापालिकेचा कारवाईला ठेंगा!

  गेल्या एक वर्षापासून या समस्येकडे महापालिकेने अक्षरशः दुर्लक्ष केले आहे. एकाही पशुपालकावर दंडात्मक कारवाई झाली नसल्याची माहिती उघड झाली आहे. मोकाट जनावरे पकडून साठवण्यासाठी कोर्डवाडा नसल्यामुळे महापालिकेला ती अन्यत्र पाठवावी लागतात. त्यामुळे त्यासाठी होणाऱ्या खर्चामुळे प्रशासन हेतुपुरस्सर कारवाई टाळत असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा

  या मुद्द्यावर आता शहरातील सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले असून, महापालिकेवर दबाव वाढवण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. "जर वेळेत मोकाट जनावरांचा बंदोबस्त झाला नाही, तर आम्ही ती गुरे थेट महापालिकेच्या आवारात सोडू," असा इशारा सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बेडसे यांनी दिला आहे. त्यांच्या मते, शहरातील नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा केवळ सुविधा पुरवण्याचा नव्हे, तर प्रशासनाच्या कर्तव्याचा भाग आहे. त्यामुळे महापालिकेने त्वरित कारवाई करून शहर मोकाट गुरांपासून मुक्त करावे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

काय आहे उपाय?

  विशेष म्हणजे, इतर महानगरपालिकांप्रमाणे धुळे महापालिकेकडेही मोकाट जनावरांसाठी कायमस्वरूपी निवारा उभारणे शक्य आहे. त्यासाठी निधी मंजूर करून स्वतंत्र कोर्डवाडा उभारणे, नियमितपणे गुरे पकडण्याचे पथक कार्यान्वित करणे, पशुपालकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करणे असे उपाय केले गेले पाहिजेत.

  धुळे शहराच्या सौंदर्याला आणि वाहतूक सुरळीततेला बाधा ठरणारी मोकाट जनावरांची समस्या प्रशासनाने गांभीर्याने घेतली नाही, तर नागरिकांच्या संयमाचा कडेलोट होण्यास वेळ लागणार नाही.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -