धुळे दर्पण न्यूज :- प्रकल्पग्रस्त दाखल्यासाठी फक्त दोन हजार रुपयांची लाच घेताना शिंदखेडा तालुक्यातील तामथरे येथील मंडळ अधिकारी छोटू महादू पाटील (वय ५४) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. २० जून) दुपारी चिमठाणे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात करण्यात आली. विशेष बाब म्हणजे, आरोपी अधिकाऱ्याचा मासिक पगार सुमारे ९० हजार रुपये असूनही त्यांनी दोन हजार रुपयांची लाच घेतल्याने मोठी चर्चा सुरु झाली आहे.

शेतकऱ्याच्या मुलाला प्रकल्पग्रस्त दाखल्याची गरज

  सोनगीर येथील एका शेतकऱ्याची शेतजमीन सोंडले शिवारात असून ती सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत संपादित झाली आहे. शेतकऱ्याच्या मुलाला नोकरीसाठी प्रकल्पग्रस्त दाखल्याची आवश्यकता होती. त्यासाठी संबंधित युवकाने दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागात अर्ज सादर केला होता.

- Advertisement -

  सदर अर्ज चौकशीसाठी शिंदखेडा तहसीलदारांच्या मार्गे मंडळ अधिकारी छोटू पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला होता. युवकाने वेळोवेळी आवश्यक कागदपत्रे सादर केली असूनही पाटील यांनी चौकशी अहवाल तहसीलदारांकडे पाठवला नव्हता.

तीन हजार रुपयांची मागणी, दोन हजारांवर तडजोड

  दि. १८ जून रोजी संबंधित युवकाने चिमठाणे येथील कार्यालयात पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी अहवाल पुढे पाठवण्यासाठी थेट तीन हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे त्रस्त युवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाली असता पाटील यांनी तडजोड करत दोन हजार रुपये स्वीकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले.

रंगेहाथ अटक आणि घराची झडती

  त्याअनुषंगाने २० जून रोजी दुपारी चिमठाणे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंके यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक रुपाली खांडवी, कर्मचारी राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा आदींच्या पथकाने पाटील यांना दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.

  त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

  कारवाईनंतर आरोपी पाटील यांच्या देवपूर, गीता नगर येथील भाड्याच्या घराची झडती घेण्यात आली. रात्री उशीरापर्यंत ही झडती सुरू होती. पाटील मूळचे शिरपूर येथील रहिवासी आहेत.

लाच घेतल्यामुळे अधिकारी अडकल्याने खळबळ

  जिल्हा प्रशासनातील कर्मचारी उच्च वेतन असूनही नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सेवा मिळण्यासाठी लाच मागत असल्याचे पुन्हा एकदा या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. विशेषतः केवळ दोन हजार रुपयांच्या मोबदल्यात एक मंडळ अधिकारी स्वतःच्या कारकिर्दीला कलंक लावून घेत असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या घटनेमुळे शिंदखेडा तालुक्यात तसेच जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली असून प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नागरिकांमध्ये देखील नाराजी असून, भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.

________________________________________________

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -