धुळे दर्पण न्यूज :- अखेर महापालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ड वर्गात मोडणाऱ्या धुळे महापालिकेने प्रभाग रचनेसाठी आवश्यक नियोजनास ११ जूनपासून सुरुवात केली आहे. नगरविकास विभागाने दिलेल्या आदेशानुसार, महापालिका निवडणुकीसाठी नव्या प्रभाग रचनेची प्रारूप घोषणा १५ जुलैला तर अंतिम घोषणा १ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा प्रत्येक प्रभागात सरासरी २४ हजार लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
न्यायालयीन आदेशानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा
राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना सुरू करण्याचे आदेश सर्व महापालिकांना दिले. यापार्श्वभूमीवर धुळे महापालिकेने देखील पुढाकार घेत कामाला गती दिली आहे. सध्या महापालिकेत प्रशासकाची व्यवस्था आहे. त्यामुळे नव्या प्रतिनिधींची निवड लवकरच अपेक्षित आहे.
![]() |
| - Advertisement - |
नियोजनानुसार टप्प्याटप्प्याने काम
धुळे महापालिकेने प्रभाग रचनेसाठी सविस्तर वेळापत्रक आखले असून, त्यानुसार ११ ते १६ जूनदरम्यान २०११ च्या जनगणनेनुसार ७५० लोकसंख्येचे प्रगणक गट तयार करण्यात येत आहेत. या गटांची माहिती व तपशील १७ ते १८ जूनदरम्यान तपासण्यात येणार आहे. त्यात शहराची एकूण लोकसंख्या, स्त्री-पुरुषांचे प्रमाण, अनुसूचित जाती-जमातींची लोकसंख्या या सर्वांचा समावेश असणार आहे.
१९ ते २३ जून दरम्यान प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली जाईल. यामध्ये प्रत्येक प्रगणक गटाच्या सीमा प्रत्यक्ष जाऊन तपासल्या जातील. २४ ते २६ जूनदरम्यान गुगल मॅपच्या साहाय्याने नकाशे तयार होतील. हे नकाशे जमिनीवर निश्चित करून प्रभागांचे सीमांकन केले जाईल.
प्रारूप रचना १५ जुलैला, हरकतींसाठी वेळ
प्रारूप प्रभाग रचनेवर १ ते ३ जुलैदरम्यान समितीकडून स्वाक्षरी घेतली जाईल, तर ४ ते ८ जुलैदरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर १५ ते २१ जुलैदरम्यान प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. यादरम्यान नागरिक, संस्था व राजकीय पक्षांना हरकती व सूचना नोंदवण्याची संधी दिली जाईल.
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनावणी
प्राप्त हरकतींची सुनावणी २२ ते ३१ जुलै दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली केली जाणार आहे. यानंतर अंतिम प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येईल. आयोगातर्फे २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल.
![]() |
| - Advertisement - |
१० टक्के वाढ-घट शक्य
प्रत्येक प्रभागात सरासरी २४ हजार लोकसंख्या ठेवण्याचे नियोजन असून, प्रगणक गटाचा उपयोग करून ही रचना करण्यात येईल. मात्र, भौगोलिक गरजेनुसार किंवा विशेष बाबतीत एखाद्या प्रभागात लोकसंख्या थोडीशी अधिक अथवा कमी असल्यास ±१० टक्क्यांची मर्यादा ठेवण्यात आली आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
धुळेकरांचे लक्ष आता प्रभाग रचनेच्या पुढील टप्प्याकडे लागले आहे. प्रारूप आणि अंतिम रचना प्रसिद्ध झाल्यानंतरच निवडणुकीच्या तारखा निश्चित होतील. त्यामुळे राजकीय हालचालींना उधाण येण्याची शक्यता आहे.
📌 धुळे महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग – प्रभाग रचना ठरवण्यासाठी यंत्रणा सज्ज



