किमान वेतन, सुविधा न मिळाल्याने संताप; प्रशासनासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा


  धुळे दर्पण न्यूज :- महापालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या घंटागाडी व ट्रॅक्टर कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काल रविवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. शहरातील क्युमाईन क्लबसमोर सकाळी सात वाजता आंदोलनाची सुरुवात झाली असून, प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कामगारांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासनाला याबाबतचे निवेदन सादर करत आपली मागणी स्पष्ट केली. वर्षानुवर्षे सेवेत असूनही या कामगारांना आजतागायत किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), कर्मचारी राज्य विमा (ईएसआय), कायदेशीर रजा, गणवेश, हातमोजे, गमबूट यांसारख्या मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. इतकेच नव्हे, तर दरमहा सात तारखेपूर्वी वेतन देणे कायद्याने बंधनकारक असूनही, वेळेवर वेतन न मिळण्याची तक्रारही संघटनेकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

  संघटनेच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी या विषयावर झालेल्या अधिकृत बैठकीत प्रशासनाने किमान वेतन लागू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात ट्रॅक्टरवर कार्यरत कामगारांना अजूनही याचा लाभ मिळालेला नाही. संघटनेने हे एकप्रकारे कामगारांप्रतीचा भेदभाव व कायद्याचे सरळसरळ उल्लंघन असल्याचा आरोप केला आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  कामगारांनी प्रशासनास कठोर इशारा देत सांगितले आहे की, जर तातडीने मागण्यांची पूर्तता झाली नाही, तर कुटुंबीयांसह महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाचा परिणाम शहरातील स्वच्छता व्यवस्था व इतर सार्वजनिक सेवांवर मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  कामगारांच्या या आंदोलनामुळे शहरातील नागरिकांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. अनेकांनी प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे व कामगारांच्या न्याय्य मागण्या मान्य करून आंदोलन संपवावे, अशी मागणी केली आहे. निवेदनावर संबंधित कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -