धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील मध्यवर्ती व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या पाचकंदील चौकात पुन्हा एकदा वाद झाल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली. सोमवारी दुपारी हातगाडी लावण्यावरून दोन व्यक्तींमध्ये सुरू झालेला वाद परिसरातील नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे चिघळला. परिणामी, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा पाचकंदील चौकातील अतिक्रमण, वाहतुकीची समस्या आणि महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
वादातून तणाव, पोलिस बंदोबस्तात वाढ
दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका फळ विक्रेत्याच्या समोर लिंबू विक्रेत्याने आपली हातगाडी लावली. दुकानातील कामगाराने ती पुढे करण्यास सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर परस्परांमध्ये मारहाण झाली आणि इतर विक्रेत्यांनी हस्तक्षेप करत असताना परिसरात नागरिक जमा होऊ लागले. तणावाची स्थिती लक्षात घेऊन आझादनगर आणि शहर पोलिसांनी तत्काळ धाव घेतली आणि दोन्ही जखमींना हिरे रुग्णालयात हलवले. पोलिसांशी काही जणांनी हुज्जत घातल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
![]() |
| - Advertisement - |
महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई पुन्हा सुरू
वादानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलिस बंदोबस्तात पाचकंदील चौकातील अतिक्रमण हटवले. ऐंशी फुटी रस्त्यावर सुभाष चौक ते रेल्वे स्टेशन मार्गावरील ४० अतिक्रमण हटवण्यात आले. गटारींवर झालेली बांधकामे, स्टॉल, टपऱ्या, ओटे जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले.
या कारवाईचे नेतृत्व अतिक्रमण विभाग प्रमुख प्रसाद जाधव यांनी केले. महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र, नागरिकांच्या म्हणण्यानुसार अतिक्रमण विभागाचा हा कारवाईचा पवित्रा केवळ "दिसण्यापुरता" आहे. सातत्याचा अभाव आणि वेळोवेळीच कारवाई केल्याने अतिक्रमण पुन्हा पुन्हा होते.
वारंवार वाद, मात्र कायमस्वरूपी तोडगा नाही
गेल्या २३ दिवसांतील ही तिसरी अशांततेची घटना असून, १ जूनला कारचालक व फळ विक्रेत्यामध्ये वाद, १० जूनला दुचाकी चालकासोबत वाद, आणि आता पुन्हा हातगाडी लावण्यावरून झालेला वाद या घटनांच्या मालिकेने प्रशासनाची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.
![]() |
| - Advertisement - |
विशेष म्हणजे या वादामध्ये सामील असलेले सोनार व बागवान यांच्यात पूर्वी चांगले संबंध होते. त्यांच्यातील वाद वैयक्तिक होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, या छोट्याशा वादात इतरांनी हस्तक्षेप करताच त्याचा स्वरूप बदलले आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
नगरपालिका विभागावर नागरिकांचा रोष
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सातत्याने अतिक्रमणविरोधी कारवाई केली जात नसल्याने अतिक्रमण करणाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. मुख्य बाजारपेठ, वडजाई रोड, तिरंगा चौक, अग्रसेन महाराज पुतळा परिसर, चाळीसगाव रोड या भागात वारंवार अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जातो.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या पार्श्वभूमीवर, नागरिक व स्थानिक व्यापाऱ्यांकडून महापालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्तरित्या कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा अतिक्रमण हटवण्याची ही 'पुढे पाट, मागे सपाट' शैली कायम राहील, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.



