धुळे दर्पण न्यूज :- नेर गावातील नूरनगर व चंदन टेकडी परिसरात सतत होणाऱ्या वीज खंडिततेमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम भदाणे यांच्या प्रयत्नातून आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या सहकार्यातून दोन १०० एचपी क्षमतेचे ट्रान्सफार्मर मंजूर होऊन रविवारी लोकार्पण करण्यात आले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या भागात पूर्वी ६३ एचपी क्षमतेचे ट्रान्सफार्मर कार्यरत होते. मात्र कृषी पंपांचा वाढता भार यामुळे वारंवार ट्रान्सफार्मर फेल होण्याच्या घटना घडत होत्या. परिणामी शेतीसाठी पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने शेतकरी मोठ्या समस्येत सापडले होते. विशेषतः बागायती शेती करणार्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते.
ही समस्या लक्षात घेऊन नेरचे माजी सरपंच व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा आमदार राम भदाणे यांच्यापर्यंत पोहोचवल्या. खलाणे यांनी सातत्याने पाठपुरावा करत ही मागणी महावितरण व प्रशासनाकडे मांडली. आमदार राम भदाणे यांनी तत्परता दाखवत पालकमंत्री जयकुमार रावल, महावितरणचे कार्यकारी अभियंता आणि जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करून दोन उच्च क्षमतेचे ट्रान्सफार्मर मंजूर करून घेतले.
![]() |
| - Advertisement - |
रविवारी झालेल्या लोकार्पण सोहळ्यात आ. राम भदाणे यांच्या हस्ते ट्रान्सफार्मरचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये माजी कृषी सभापती अरविंद जाधव, सरचिटणीस बाळासाहेब भदाणे, अकलाडचे सरपंच अजय माळी, भाजपाचे संजय माळी, गोटू अमृत सागर वितरण कंपनीचे पंकज वाघ, हर्षल मराठे, तसेच स्थानिक शेतकरी शामराव जाधव, मनोज बोरसे, भटू भागवत, गणेश देवरे, पंडित देवरे यांचा समावेश होता.
कार्यक्रमात नेर सबस्टेशनचे अभियंता दिनेश आहेर आणि आमदारांचे स्वीय सहायक सचिन भदाणे यांनीही सक्रिय सहभाग घेतला.
शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार राम भदाणे आणि शंकरराव खलाणे यांचे आभार मानले. या नवीन ट्रान्सफार्मरमुळे शेतीसाठी वीजपुरवठा सुरळीत राहणार असून शेती व्यवसायात अडथळे येणार नाहीत, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या निर्णयामुळे नेर गावातील शेतीला नवी ऊर्जा मिळाली असून, हा निर्णय ग्रामीण भागातील कृषी विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.


