धुळे दर्पण न्यूज :- राज्यातील शस्त्र तस्करीच्या साखळीत मोठा धक्का देत वरला पोलिसांनी धुळे व नाशिक जिल्ह्यातील दोन युवकांना अवैध पिस्तूलांसह रंगेहाथ पकडले. ही कारवाई शिरपूर तालुक्यातील वलवाडी येथे करण्यात आली असून, संशयितांकडून दोन पिस्तूले, तीन जिवंत काडतुसे व एक बजाज पल्सर मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
ही धडक कारवाई गुरुवारी (दि. २६ जून) करण्यात आली. मध्यप्रदेशातील उमरटी हे गाव अवैध शस्त्र निर्मिती आणि विक्रीसाठी कुप्रसिद्ध असून, संशयितांनी तेथून ही शस्त्रे खरेदी करून महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला होता. याची गुप्त माहिती वरला पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पीआय सौरभ बाथम यांना मिळताच त्यांनी तत्काळ कारवाईचे नियोजन केले.
![]() |
| - Advertisement - |
पोलीस पथकाने शिरपूर तालुक्यातील वलवाडी गावाजवळ नाकाबंदी केली असता, बजाज पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा युवकांना संशयास्पद हालचाली करताना अडवून तपासणी केली. या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांची नावे सागर भगवान पॉलिगिरो (रा. चौगाव, ता. धुळे) आणि सागर उर्फ माया मधुकर मोरे (रा. कानडगाव, ता. चांदवड, जि. नाशिक) असल्याचे निष्पन्न झाले.
त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून २ देशी बनावटीची पिस्तूले, ३ जिवंत काडतुसे आणि एक बजाज पल्सर मोटारसायकल असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वरला पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, हे शस्त्र कोठे वापरण्यात येणार होते याचा तपास केला जात आहे.
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक जगदीश डावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार पीआय सौरभ बाथम, पीएसआय रमेश चव्हाण, एएसआय महेंद्रसिंह चव्हाण, मनीष सोलंकी व त्यांच्या पथकाने हे यशस्वी ऑपरेशन पार पाडले.
![]() |
| - Advertisement - |
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचे आणखी काही साथीदार असल्याची शक्यता असून, त्यांचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करीवर आणखी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."



