धुळे दर्पण न्यूज :- शहराजवळील निसर्गरम्य नकाणे तलाव परिसरात रविवारी दुपारी महाविद्यालयीन तरुणांनी मटण-दारूसह हुक्का पार्टीचे आयोजन केले होते. जंगल लागून असलेल्या या भागात ही पार्टी सुरु असताना धुळे तालुका पोलिसांनी अचानक छापा टाकत ३० तरुणांना ताब्यात घेतले. घटनास्थळी मद्याच्या बाटल्या, हुक्का सेट, सिगारेट्स, गुटखा, चुलीवरील मटण भाजी असे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले. या घटनेनंतर काही तरुण मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून इतर तरुणांना समज देऊन त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत सोडण्यात आले आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

जंगल परिसरात नियमांचे उल्लंघन

नकाणे तलाव हा परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असून तिथे वनविभागाच्या नियमांनुसार आग लावण्यास मनाई आहे. मात्र, या तरुणांनी चुलीवर मटणाची भाजी तयार करत या नियमांचे उल्लंघन केले. त्याचप्रमाणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे आणि हुल्लडबाजी करणे हे कायद्याने गुन्हा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणांपैकी काहीजण इतके बेधुंद होते की त्यांना बोलणेही शक्य नव्हते. या सर्वांची वयोमर्यादा २२ ते २५ दरम्यान आहे.

- Advertisement -

पूर्वीही मृत्यूची घटना

या तलाव परिसरात पूर्वीही अशाचप्रकारच्या पार्टीदरम्यान मृत्यूची घटना घडली होती. सहा महिन्यांपूर्वी धुळे शहरातील नातलगांकडे आलेला राजस्थानी तरुण मद्यधुंद अवस्थेत तलावात उतरल्याने जलवाहिनीत अडकला होता आणि त्यात त्याचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर जलवाहिनी खोदून मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. त्यामुळे अशा घटनांना रोखण्यासाठी पोलिसांनी या भागावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

पोलिसांची तत्काळ कारवाई

धुळे तालुका पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पथक तयार करून घटनास्थळी धाव घेतली. परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आबा जाधव, विशाल पाटील यांच्यासह पथकाने कारवाई करत सर्व तरुणांना ताब्यात घेतले. या वेळी तरुणांची वाहने, दारूच्या बाटल्या, भांडी, हुक्का व इतर साहित्य पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

कायदेशीर कारवाई आणि नोटीस बजावणी

सर्व तरुणांची नावे नोंदवून त्यांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. त्यांना यापुढे अशी चूक पुन्हा होणार नाही, यासाठी नोटीस बजावण्यात आल्या. दरम्यान, जे तरुण मद्यधुंद अवस्थेत आढळले, त्यांच्यावर ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह कायदा तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा इशारा

या घटनेनंतर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी पार्टी, मद्यपान किंवा नियमभंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल. युवकांनी आपल्या भविष्याचा विचार करून जबाबदारीने वर्तन करावे, असे आवाहन परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक सागर देशमुख यांनी केले आहे.


( मुख्यसंपादन : सैय्यद सानिल | धुळे दर्पण)


– धुळे दर्पण – 


(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)


(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)



तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम