मुंबईत सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

  धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी पुढे आली आहे. धुळेहून थेट मुंबई व पुण्याकडे जाणारी रात्रीची रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. धुळेचे आमदार अनूप अग्रवाल यांनी प्रवाशांच्या मागणीकडे लक्ष देत सेंट्रल रेल्वेचे सरव्यवस्थापक धर्मवीर मीना यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या बैठकीत सरव्यवस्थापक मीना यांनी या रेल्वे सेवा लवकरच सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन आमदार अग्रवाल यांना दिले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  मुंबई येथे झालेल्या या बैठकीत रेल्वेचे प्रधान मुख्य अभियंता रजनीश माथूर, पीसीओएम एस. एस. गुप्ता, पीसीसीएम अरविंद मालखेडे, सीपीआरओ स्वप्निल नीला आणि उपसरव्यवस्थापक के. के. मिश्रा आदी अधिकारीही उपस्थित होते.

- Advertisement -

  यावेळी आमदार अग्रवाल म्हणाले, "धुळे हे शैक्षणिक, वैद्यकीय व व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचे शहर आहे. येथे पुणे आणि मुंबई या दोन प्रमुख शहरांकडे नियमित व विशेषतः रात्रीच्या वेळेस प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, सध्या रात्री धुळेहून या दोन्ही शहरांकडे जाण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना नाशिक, मनमाड किंवा जळगावपर्यंत जावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठी धुळे ते मुंबई व पुणे दरम्यान थेट रात्रीची रेल्वे सेवा सुरू करणे अत्यावश्यक आहे."

  रेल्वे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, सध्या मुंबई व पुणे रेल्वेस्थानकांवर फलाट वाढविण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होताच धुळेहून मुंबई व पुण्याकडे जाणारी रात्रीची रेल्वे, तीही वातानुकूलित (AC कोच) सुविधेसह सुरू केली जाईल.

क्रॉसिंगवरील समस्येसाठी उड्डाणपुलाची मागणी
  या बैठकीदरम्यान आमदार अनूप अग्रवाल यांनी आणखी एक महत्त्वाचा विषय मांडला. मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगाव रोड येथील रेल्वे क्रॉसिंगमुळे दररोज नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दिवसातून किमान तीन वेळा रेल्वे येत असल्याने रस्ता बंद होतो व वाहनांची मोठी रांग लागते. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल (फ्लायओव्हर) उभारावा, अशी मागणी आमदार अग्रवाल यांनी केली.
- Advertisement -
  या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत सरव्यवस्थापक मीना यांनी लवकरच त्या ठिकाणी सर्वेक्षण करून पुलासाठी प्रस्ताव तयार करून मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

धुळेकर प्रवाशांसाठी नवा टप्पा उघडणार
  धुळेकर नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, व्यापारी वर्ग यांना ही रेल्वे सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असून, वेळ आणि पैशांची बचतही होणार आहे. तसेच उड्डाणपूल मंजूर झाल्यास शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होईल.

  आमदार अग्रवाल यांचे हे प्रयत्न निश्चितच शहरवासीयांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. आता रेल्वे प्रशासनाकडून प्रत्यक्ष अंमलबजावणीची वाट धुळेकर नागरिक आतुरतेने पाहत आहेत.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -