नळांना तोट्या, गटारी स्वच्छता व फवारणीचे आदेश; करुणा डहाळे यांची विशेष जबाबदारी

  धुळे दर्पण न्यूज :- शहरातील साक्रीरोड परिसरात गेल्या आठवड्याभरात अतिसाराची साथ पसरल्याने सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी मंगळवारी आरोग्य व पाणीपुरवठा विभागाची आपत्कालीन बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

  साक्रीरोडमधील शनीनगर, भीमनगर, यशवंत नगर व कुमार नगर या परिसरांत मोठ्या प्रमाणात अतिसाराचे रुग्ण आढळून आले आहेत. काही रुग्ण खासगी रुग्णालयात तर अनेकजण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त दगडे पाटील यांनी सोमवारी भीमनगर परिसराला भेट दिली होती. त्यानंतर तातडीने बैठक घेऊन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

- Advertisement -

नळांना तोट्या बसवण्याचे आदेश

  बैठकीत आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला स्पष्ट निर्देश दिले की, साक्रीरोड परिसरात ज्या सार्वजनिक नळांना तोट्या नाहीत, त्या नळांना तत्काळ तोट्या लावण्यात याव्यात. तसेच पाण्याच्या गळतीचा शोध घेऊन दुरुस्ती करावी.

गटारींची स्वच्छता आणि फवारणी

  आयुक्तांनी आरोग्य विभागाला निर्देश दिले की, सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी त्या परिसरातील गटारी स्वच्छ करून वाहत्या कराव्यात. डास आणि संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी फवारणीचे काम तातडीने सुरू करावे. या कामांची देखरेख करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांची विशेष जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

पाण्याचे नमुने व रुग्ण सर्वेक्षण

  साथीचा नेमका कारणभूत घटक शोधण्यासाठी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत. जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची माहिती संकलित करून ते कोणत्या भागातील आहेत, याची यादी तयार केली जाणार आहे. रुग्णांच्या घराजवळील परिसरात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण करण्यात येईल. संशयित रुग्णांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी केल्या.

- Advertisement -

नागरिकांनी सहकार्य करावे – आयुक्तांचे आवाहन

  महापालिकेच्या आरोग्य विभागासोबतच नागरिकांनीही स्वच्छतेची काळजी घ्यावी, उघड्यावर सांडपाणी टाकू नये, पिण्याचे पाणी उकळूनच प्यावे व कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी केले आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  साक्रीरोड परिसरात सध्या महापालिकेच्या यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असून, संभाव्य साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -