धुळे दर्पण न्यूज :- स्टेट बँकेच्या प्रमोदनगर शाखेत झालेल्या वादामुळे बँक कर्मचारी आणि शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा संघर्ष उफाळून आला आहे. बँकेतील महिला प्राध्यापिकेला शिवीगाळ व मराठी भाषेचा अवमान केल्याच्या आरोपावरून सुरू झालेल्या या वादात आता गुन्हे दाखल होण्यापर्यंतची परिस्थिती निर्माण झाली आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
सोमवारी घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी बँक कर्मचारी संघटनेने जोरदार आंदोलन केले. प्रमोदनगर शाखेचे कामकाज दिवसभर ठप्प ठेवण्यात आले. याचदरम्यान, बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाच्या १९ कार्यकर्त्यांविरुद्ध शासकीय कामात अडथळा व मारहाणीचे गुन्हे दाखल केले असून, त्यातील दोन पदाधिकाऱ्यांना अटकही करण्यात आली आहे.
घटना कशी घडली?
देवपूर परिसरातील प्रमोदनगर येथील स्टेट बँकेच्या शाखेत एका ४३ वर्षीय महिला प्राध्यापिका सोमवारी गेल्या होत्या. गोल्ड लोनचे हप्ते भरण्यास उशीर झाल्याने बँकेचे मॅनेजर अतुल गांधी व अन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी वाद घातल्याचे महिलेचे म्हणणे आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बँकेतील दोन अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी उद्धटपणे बोलत शिवीगाळ केली, दमदाटी केली व विनयभंग केल्याचे आरोप आहेत. तसेच मराठी भाषा आणि मराठी प्रांताविषयी अवमानकारक वक्तव्ये केल्याचीही तक्रार आहे. या प्रकरणावरून देवपूर पोलीस ठाण्यात विनयभंग व इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]() |
| - Advertisement - |
शिवसेनेची बँकेत धडक
ही घटना समजल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी बँकेत पोहोचले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला. या दरम्यान बँकेतील वातावरण तणावपूर्ण बनले आणि कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की व मारहाणीची वेळ आली. त्यामुळे बँकेच्या वतीने अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी असा आरोप केला की, कुठलीही माहिती न घेता बँकेत घुसून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, कामकाजात अडथळा आणला आणि काही अधिकाऱ्यांना हात उगारले.
बँक कर्मचार्यांचे आंदोलन
या प्रकाराने चिडलेल्या बँक कर्मचारी संघटनेने मंगळवारी आंदोलन छेडले. प्रमोदनगर शाखेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यामध्ये एसबीआय ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन गांगुर्डे, विनोद मराठे, लक्ष्मण पाटील, शफिक पिंजारी आदींसह दोनशेहून अधिक कर्मचारी सहभागी झाले. सर्व शाखांमधील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. बँक कर्मचारी दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत आहेत.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
शिवसेनेच्या १९ जणांवर गुन्हा, अटक
बँकेचे अधिकारी सदाशिव अजगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून १९ शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्ध शासकीय कामात अडथळा, मारहाणीचे व धमक्यांचे गुन्हे दाखल करण्यात आले. यातील दोन – नरेंद्र परदेशी व धीरज पाटील यांना पोलिसांनी रात्री उशिरा अटक करून आझादनगर पोलीस ठाण्यात ठेवले. मंगळवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
![]() |
| - Advertisement - |
प्रशासनाची मध्यस्थी, पण तणाव कायम
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले. त्यांनी पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल झाल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.
राजकीय पार्श्वभूमीवर तणाव
या घटनेमुळे जिल्ह्यात राजकीय तापमान वाढले आहे. एका बाजूला महिलेला झालेल्या वागणुकीविरोधात शिवसेनेची आक्रमक भूमिका, तर दुसरीकडे बँकेतील शिस्तभंगावर रोष व्यक्त करणारे कर्मचारी अशा परिस्थितीत प्रशासनाची कसरत वाढली आहे.



