धुळे दर्पण न्यूज :- नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलेमिया या इस्लामिक धार्मिक संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या मदरशात परदेशी नागरिकाला बनावट कागदपत्रांच्या आधारे थांबवून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत धुळे शहराचे आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले.

🕌 नऊ वर्षे बेकायदेशीर वास्तव्य, बनावट कागदपत्रे वापरल्याचा आरोप
  येमेन देशातील एक व्यक्ती उपचारासाठी कुटुंबासह भारतात आला होता. मात्र, व्हिसाची मुदत संपूनही तो गेली नऊ वर्षे संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्यास होता. या गंभीर प्रकरणात ११ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलिस ठाण्यात येमेनमधील संबंधित व्यक्ती आणि संस्थेच्या संस्थापक अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -

📌 राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्याचे आरोप
  आमदार अग्रवाल यांनी या प्रकरणाला महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्याचे गंभीर आरोप केले असून, त्याचे ठोस पुरावे देखील उपलब्ध असल्याचे विधानसभेत सांगितले.

⚖️ देशद्रोहाचा गुन्हा आणि आर्थिक चौकशीची मागणी
  याप्रकरणी सरकार या संस्थेच्या अध्यक्ष व संचालकांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का, तसेच संस्थेची आर्थिक घडामोडींची चौकशी ईडीमार्फत करणार का, अशी विचारणा आमदार अग्रवाल यांनी केली. तसेच राज्यातील मदरसे, उर्दू शाळा आणि ख्रिस्ती मिशनरी संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेतून शिक्षण सुरू करणे बंधनकारक करणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

🏛 गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे उत्तर
  या प्रश्नांना उत्तर देताना गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले की, सदर प्रकरणाची चौकशी अँटी-टेररिझम स्क्वॉड (एटीएस) मार्फत सुरू आहे. संस्थेच्या आर्थिक उलाढाली मोठ्या प्रमाणात झाल्या असल्याने हे प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे (ईडी) सुपूर्द करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. तसेच धर्मादाय आयुक्तांकडेही योग्य ती कारवाई करण्याबाबत गृह विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
- Advertisement -

📚 मराठी शिक्षणाबाबत निर्णयाची मागणी
  मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेतून शिक्षणाची सोय सक्तीने लागू करावी, अशी आग्रही मागणी आमदार अग्रवाल यांनी केली.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -