धुळे दर्पण न्यूज :- पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक २६ जुलै २०२५ रोजी कोल्हापूर येथे होत असून, या अधिवेशनासाठी धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातून पदविकाधारक पशुवैद्यक मोठ्या संख्येने जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय सचिव डॉ. संजय पाटील यांनी दिली आहे.

या अधिवेशनात आमदार सौ. मंजुळा गावित व आमदार श्रीमती मनीषा कायंदे यांनी विधानसभेत व विधानपरिषदेत सादर केलेल्या दुय्यम पशुवैद्यकीय परिषद अशासकीय विधेयकावर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच आमदार श्री. मंगेश चव्हाण व इतर आमदारांच्या प्रयत्नातून इयत्ता १२ वी विज्ञान नंतर तीन वर्षे कालावधीचा पशु चिकित्सा शास्त्र पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अद्याप तो सुरू न झाल्यामुळे त्यावरही सखोल चर्चा अपेक्षित आहे.

अधिवेशनात पुढील प्रमुख मुद्द्यांवर विचारमंथन होणार आहे –

  • पशुधन पर्यवेक्षकांच्या तब्बल ४००० रिक्त पदांची सरळसेवा भरती तात्काळ सुरू करणे,
  • कृत्रिम रेतन तंत्रज्ञ नोंदणी प्रक्रियेत आक्षेपार्ह त्रुटींचा आढावा,
  • पदविकाधारक पशुवैद्यकांच्या शैक्षणिक दर्जा व व्यावसायिक हक्कांच्या संरक्षणासाठी ठोस पावले.

याच पार्श्वभूमीवर दिनांक २५ जुलै रोजी अधिवेशन स्थळी भारतीय पशु चिकीत्सा सेवा महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची विशेष बैठक होणार आहे. या बैठकीत देशभरातील पदविकाधारकांसाठी "एकच व्यावसायिक नोंदणी परिषद, एकच कायदा, एकच शैक्षणिक अर्हता (पदविका), एकच कर्तव्य-जवाबदाऱ्या, एकच वेतन स्तर, एकच पदोन्नती टप्पे" अशा व्यापक मागण्यांवर चर्चा होईल आणि राष्ट्रीय स्तरावरील पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, अशी माहिती राष्ट्रीय सचिव डॉ. संजय पाटील यांनी दिली.

अधिवेशनाच्या निमित्ताने महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्मयोगी डॉ. नारायणराव जोशी यांच्या ९० वर्षांच्या कार्यपथाचा गौरव देखील करण्यात येणार आहे.

कोल्हापूर अधिवेशनासाठी खान्देशातील धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत तालुका व जिल्हास्तरावरील बैठका आयोजित केल्या असून, मोठ्या संख्येने सहभागासाठी नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनात डॉ. अनिल पाटील, डॉ. पुरुषोत्तम पाटील, डॉ. अमोल बोरसे, डॉ. सचिन शिंपी, डॉ. अजय पाटील, डॉ. भरत बोरसे, डॉ. विजय भामरे, डॉ. कुंवर, डॉ. ईश्वर देसले, डॉ. अक्षय धनगर, डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. दत्तु पाटील, डॉ. समाधान पाटील, डॉ. संजय सोनवणे, डॉ. संजय बोंगाणे आदी पदाधिकारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातही उत्स्फूर्त तयारी सुरू असून, राज्यभरातील पदविकाधारक पशुवैद्यकांच्या एकत्रित व्यासपीठावरून व्यावसायिक हितासाठी ठोस दिशा ठरविण्याचे या अधिवेशनाचे उद्दिष्ट असणार आहे.