धुळे दर्पण न्यूज :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धुळे भेटीस यंदा ८८ वर्षे पूर्ण होत आहेत. ३१ जुलै १९३७ रोजी त्यांनी वाघाडी (शिरपूर) येथील बैलपोळा प्रकरणाच्या अनुषंगाने धुळे व शिरपूर येथे भेट दिली होती. त्या वेळी धुळे शहरात त्यांच्या सन्मानार्थ भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता संदेशभूमी (ट्रॅव्हलर्स बंगलो) येथे भव्य संदेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याची माहिती कृती समितीचे प्रमुख श्री. आनंद सैंदाणे यांनी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
विशेष आकर्षण : ८४ हजार बुद्ध मूर्तींचे वितरण
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गगन मलिक फाउंडेशन तर्फे देशभरात तथागत भगवान बुद्ध यांच्या ८४ हजार मूर्तींचे वितरण करण्यात येणार आहे. या मूर्ती मोफत असणार असून, केवळ वाहतूक व शुल्क संबंधित खर्च मूर्ती घेणाऱ्यांना भरावा लागणार आहे. मूर्ती मिळविण्यास इच्छुक नागरिकांनी थेट संदेशभूमी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]() |
| - Advertisement - |
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे. विशेष प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे धम्मदूत व अभिनेता गगन मलिक हे हजेरी लावणार आहेत. गगन मलिक यांनी ‘तथागत बुद्ध’ चित्रपटात बुद्धांची भूमिका साकारली असून, बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य सातत्याने करत आहेत.
मेळाव्यास पूज्य भंते आनंद थेरो, भिक्कुनी आर्या शीलरक्षिता, आर्या वैशाली, भंते बोधिपाल, भंते धम्मानंद, भंते विनयप्रिय, भंते नागसेन, भिक्कुनी आया सुप्रिया आदी धम्मगुरूंचे विशेष आशीर्वाद लाभणार आहेत.
त्याचप्रमाणे खासदार, आमदार व प्रशासकीय अधिकारी तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये नामदार जयकुमार रावल, आमदार अनिल पाटील, आमदार अनुप अग्रवाल, आमदार मंजुळा गावित, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, प्रा. बाबा हातेकर, युवानेते सिद्धार्थ बनसोडे, प्रा. सुनील मगरे, इर्शाद जहागीदार, कैलास चौधरी, संजय अवसरमल, अॅड. भैय्यासाहेब झाल्टे, अॅड. मधुकर भिसे, डॉ. कृष्णमोहन सैंदाणे, डॉ. यशवंत महाले, डॉ. जगदीश पाखरे, डॉ. गौतम शिलवन, डॉ. दिपक शेजवळ, डॉ. विजय कांबळे, दिलीप आग्गा साळवे, अभियंता अनिल पवार, राहूल अग्रवाल, सतीश महाले, मनोज मोरे आदींचा समावेश आहे.
भीमगीतांचा रंगतदार कार्यक्रम
मेळाव्यात कवी भास्कर अमृतसागर, घनश्याम थोरात आणि शाहीर सुनिल थोरात यांच्या सुमधुर भीमगीतांचा विशेष कार्यक्रमही होणार आहे, ज्यामुळे वातावरण अधिकच भारावून जाईल.
संदेशभूमीला ऐतिहासिक वास्तूचा दर्जा मिळावा, मागणी कायम
३१ जुलै १९३७ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी धुळे येथे आले असता ट्रॅव्हलर्स बंगलो येथे मुक्काम केला व धुळेकर जनतेला महत्त्वपूर्ण संदेश दिला होता. या वास्तूचा समावेश ऐतिहासिक स्थळात व्हावा, यासाठी समितीने शासन दरबारी वेळोवेळी पुरावे सादर करून पाठपुरावा केला आहे. समाजकल्याण आयुक्तालयाच्या आदेशानुसार तसेच अधीक्षक उपायुक्त समाजकल्याण विभाग, नाशिक-धुळे यांनीसुद्धा हा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला आहे. मात्र अद्याप शासनाकडून अपेक्षित निर्णय झालेला नाही. शासनाने या वास्तूला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा देऊन जतन व संवर्धन करावे, अशी मागणी आनंद सैंदाणे यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा केली.
![]() |
| - Advertisement - |
सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
या कार्यक्रमात प्रबुद्ध नागरिक, विद्यार्थी, अभ्यासक, युवा वर्ग, बौद्ध अनुयायी आणि सर्वच धुळेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीचे प्रमुख आनंद सैंदाणे तसेच स्वागताध्यक्ष जी. के. गवळे व समितीचे दीपक नगराळे, विजय सूर्यवंशी, बाळासाहेब अहिरे, नाना साळवे, आनंद शिंदे, विजय भामरे, आनंदा सोनवणे, भद्रकुमार वाघ, संजयनाना अहिरे, शरद बंदे, चंद्रकांत बागुल, सागर साळुंके, दिनेश पगारे, दयाराम लॉके आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
📍 स्थळ: संदेशभूमी (ट्रॅव्हलर्स बंगलो), धुळे बसस्थानकाजवळ


