आज सकाळी खोपडे समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. हा मोर्चा चाळीसगाव रोडवरील खोपडे यांच्या निवासस्थानाजवळून निघाला. मात्र प्रशासनाच्या विनंतीवरून मोर्चा अर्ध्यावरच थांबविण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत खोपडे यांच्यावर दाखल गुन्हा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.
![]() |
| - Advertisement - |
तक्रारीतील गंभीर आरोप
शहादा तालुक्यातील असलोदजवळील ३५ वर्षीय महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २६ जून रोजी चाळीसगाव चौफुलीवर पाच जणांनी तिची छेड काढली, अश्लील हावभाव केले आणि जबरदस्तीने तिला गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या पर्समधील रोख रक्कम हिसकावून घेतली गेल्याचा आरोप तिने केला आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी "जर आमच्याविरोधात साक्ष दिली, तर जिवंत सोडणार नाही" अशी धमकीही दिली.
या प्रकरणी दीपक उर्फ बंटी खोपडे, परशुराम परदेशी (परशुभैय्या), विक्की वाघ, वाल्मीक मराठे, रोहन रायगुडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास पीएसआय हरिश्चंद्र पाटील करत आहेत.
समर्थकांचा पलटवार : गुन्हा खोटा, राजकीय सूडबुद्धीचा भाग
खोपडे यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की, "या प्रकरणात दाखल झालेला एफआयआर खोटा असून घटनास्थळी काहीही घडलेलं नाही. संपूर्ण प्रकरण हे चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या नोंदीत बोगस पद्धतीने दाखल करण्यात आलं आहे. खरे आरोपी कोणीही नसताना बंटी खोपडे व त्यांच्या सहकाऱ्यांची बदनामी करण्यासाठी हा प्रकार रचण्यात आला आहे."
![]() |
| - Advertisement - |
समर्थकांच्या मते, दीपक खोपडे हे आगामी महापालिका निवडणुकीत प्रभावी उमेदवार म्हणून उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच काही राजकीय नेते, विशेषतः गजेंद्र महादेव अंपळकर यांच्या दबावाखाली हा गुन्हा घडवून आणण्यात आला, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग
या आंदोलनात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. निवेदनावर अनेक महिलांच्या स्वाक्षऱ्या असून त्या सुद्धा या गुन्ह्याचा निषेध करत होत्या. त्यांनी सांगितलं की, "बंटी खोपडे हे आमच्या परिसरातील एक सज्जन आणि मदतीला तत्पर असलेले कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर असा आरोप होणं ही आमच्या प्रतिष्ठेवरही घाला आहे."
प्रशासनाची भूमिका व पुढील तपास
चाळीसगाव रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. दुसरीकडे, खोपडे समर्थकांचा रोष लक्षात घेता प्रशासनाकडून या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहिलं जात आहे. पोलिस अधिक्षकांनी सांगितलं की, “गुन्ह्याची चौकशी निष्पक्षपणे केली जाईल, कोणताही राजकीय दबाव सहन केला जाणार नाही.”
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रकरण गाजणार
या प्रकरणामुळे धुळेच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. एका बाजूला महिला तक्रारदाराचे गंभीर आरोप, तर दुसरीकडे खोपडे समर्थकांचा राजकीय षड्यंत्राचा दावा – यामुळे हे प्रकरण केवळ पोलीस तपासापुरते मर्यादित न राहता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही गाजणार आहे, हे निश्चित आहे.



