धुळे दर्पण न्यूज :- महावितरण कंपनीच्या २५ जून २०२५ रोजीच्या पुनरावलोकन आदेशाद्वारे लादण्यात आलेल्या वीज दरवाढीचा निषेध करण्यासाठी धुळे येथे विविध औद्योगिक आणि व्यापारी संघटनांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. All India Renewable Energy Association, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर, लघु उद्योग भारती, धुळे व्यापारी महासंघ, DAMA (धुळे अवधान मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन), Spoon Pipe Manufacturers Association आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून ही दरवाढ ‘विनाशकारी आणि दिशाभूल करणारी’ असल्याचा आरोप केला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
दरवाढीमुळे औद्योगिक क्षेत्रात गोंधळ
प्रमुख वक्त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री यांनी अलीकडेच केलेल्या विधानात नवीन वीज दर प्रणालीमुळे वीज खर्चात १०% कपात होईल, असे म्हटले होते. मात्र प्रत्यक्ष अनुभव वेगळाच आहे. नवीन दररचनेमुळे पूर्वीच्या सवलती रद्द करण्यात आल्या असून, उलट अचानक मोठ्या प्रमाणावर दरवाढ लादण्यात आली आहे. त्यामुळे औद्योगिक आणि एम.एस.एम.ई. क्षेत्रांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे आणि सर्वत्र तीव्र नाराजी पसरली आहे.
![]() |
| - Advertisement - |
दरवाढीचे ठळक दुष्परिणाम
प्रस्तावित वीज दरवाढीमुळे खालीलप्रमाणे परिणाम होणार असल्याचे संघटनांनी नमूद केले :
- एलटी कनेक्शन असलेल्या एम.एस.एम.ई. युनिट्स (जे ३ शिफ्टमध्ये चालतात) – २५% ते ३०% दरवाढ.
- सौर ऊर्जा वापरणारे युनिट्स – ६०% ते ७०% दरवाढ.
- इतर औद्योगिक युनिट्स – सुमारे २०% ते ४०% दरवाढ.
- उच्च कार्यक्षमतेचे युनिट्स – सुमारे ८% ते १२% दरवाढ.
- उत्पादन खर्च वाढल्यामुळे महाराष्ट्रातील उत्पादने शेजारील राज्यांच्या तुलनेत महाग पडतील.
सौर प्रकल्पांवर मोठा आर्थिक फटका
या दरवाढीचा सर्वात मोठा फटका सौर ऊर्जा प्रकल्पांना बसणार आहे. अनेक उद्योजकांनी महावितरणसोबत २० वर्षांचे करार करून बँकांकडून कर्ज घेतले आणि सौर प्रकल्प उभारले आहेत. मात्र, धोरणातील अचानक बदलांमुळे हे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या अशाश्वत ठरत आहेत. यामुळे गुंतवणूक आणि कर्जाचे परतफेडीचे गणित कोलमडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
धोरणावर विश्वासघात, सरकारने हस्तक्षेप करावा
औद्योगिक संघटनांनी सांगितले की, महावितरणच्या नवीन दररचनेमुळे महाराष्ट्रात नवीन उद्योग येण्याची शक्यता कमी झाली आहे. परिणामी रोजगार निर्मिती थांबेल आणि राज्याचे अर्थकारण अडचणीत येईल. शासनाने ज्या सौर ऊर्जा धोरणांना प्रोत्साहन दिले होते, त्या धोरणांवर आता स्वतःच पाणी फेरले जात आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.\
![]() |
| - Advertisement - |
मागणी : तातडीने दरवाढ मागे घ्या
संघटनांनी मुख्यमंत्र्यांना आणि ऊर्जामंत्र्यांना विनंती केली आहे की, ते यामध्ये तातडीने हस्तक्षेप करून ही अन्यायकारक दरवाढ मागे घेण्यासाठी महावितरणवर दबाव टाकावा. अन्यथा राज्यातील उद्योगधंदे अडचणीत येऊन मोठ्या प्रमाणावर उद्योग स्थलांतरित होण्याची शक्यता आहे.
पत्रकार परिषदेत उपस्थित संघटना :
- All India Renewable Energy Association
- Maharashtra Chamber of Commerce & Industries and Agriculture
- Laghu Udyog Bharati
- Dhule Vyapari Mahasangh
- DAMA (Dhule Awdhan Manufacturing Association)
- Spoon Pipes Manufacturers Association
या पत्रकार परिषदेत संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दस्तऐवज, आकडेवारी आणि वीज दरवाढीचे तांत्रिक विश्लेषण सादर करत आपली भूमिका स्पष्ट केली.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."



