धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील माधवपुरा परिसरात झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, धुळे येथील अमली पदार्थांच्या तस्करीचा थरारक पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात धुळ्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध असलेल्या ड्रग्ज टोळीचा सहभाग असल्याचे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. विशेष म्हणजे या गंभीर प्रकरणात पोलिसांकडून नेहमीप्रमाणेच झाकाझाकी करण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते, माजी आमदार व कार्यसम्राट अनिल अण्णा गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडलेल्या जवळपास १२० कोटी रुपयांच्या ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणाचा धागा थेट धुळेपर्यंत पोहोचतो, असे तपासातून समोर आले आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सूत्रधार एम. आय. एम. पक्षाचा कार्यकर्ता फैजल मोहम्मद असून, तो धुळेचे माजी आमदार फारूक अन्वर शहा यांचा अतिशय जवळचा सहकारी आहे.
माधवपुरा हल्ला : पोलिसांनी प्रकरण दाबले?
या प्रकरणाच्या अनुषंगाने माधवपुरा परिसरात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात, तलवारबाजीत "परवेज" नावाच्या व्यक्तीच्या हातावर मार लागला आणि फैजल मोहम्मदच्या डोक्यावरही घाव घालण्यात आला होता. या हल्ल्याची तक्रार धुळे आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे तडजोड करण्यात आली व प्रकरण लोकांसमोर येण्यापूर्वीच दाबण्यात आले, असा आरोप अनिल गोटेंनी केला.
![]() |
| - Advertisement - |
या प्रकरणामुळे धुळे पोलिसांचा अमली पदार्थांच्या तस्करीतील भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पोलिसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना या टोळीच्या हालचालींची माहिती असूनही अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
हाँगकाँग-बँकॉकमार्गे कोकेन तस्करीचे जाळे
अनिल गोटेंनी दिलेल्या माहितीनुसार, फैजल मोहम्मदच्या टोळीचा आणखी एक सदस्य, 'खालीद' काही दिवसांपूर्वीच हाँगकाँगला गेला असून, तिथे महाराष्ट्रातून स्वस्त दरात मिळणारा गांजा नेल्याचे समोर आले आहे. टोळीची कार्यपद्धती अशी की, शिरपूर येथून स्वस्तात गांजा खरेदी करणे व त्याबदल्यात बँकॉक, हाँगकाँगमधून महागड्या कोकेनसह अन्य अमली पदार्थ भारतात आणणे.
या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून ड्रग्ज तस्करीची चर्चा असूनही, तत्कालीन आमदार फारूक अन्वर शहा यांच्या जवळच्या व्यक्तीचा सहभाग असल्यामुळे पोलिसांनी कारवाई टाळल्याचे आरोप आहेत.
![]() |
| - Advertisement - |
राजकीय संरक्षणासाठी पक्षप्रवेश?
अनिल गोटेंनी असेही उघड केले की, धुळ्यातील या टोळीच्या पाच सदस्यांना ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर, पुढील कारवाईपासून स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. त्यामुळे या टोळीला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हे गंभीर प्रकरण लक्षात घेता, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा सविस्तर खुलासा करणे धुळेकर जनतेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.
“धुळेकर जनतेने सत्य जाणले पाहिजे” – अनिल गोटे
या सर्व प्रकरणावर भाष्य करताना अनिल गोटे म्हणाले,
“धुळे शहर अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे केंद्र बनत आहे, हे भयावह वास्तव आहे. पोलिसांनी जबाबदारीने काम न करता, राजकीय दबावामुळे वा आर्थिक तडजोडीतून गुन्हेगारांना वाचवणे, ही धुळेकर जनतेच्या सुरक्षेची थट्टा आहे. हे प्रकरण लोकांसमोर आले पाहिजे.”
या प्रकरणात मोठ्या रकमेच्या तोडपाण्याचा आरोप, अमली पदार्थांचा आंतरराष्ट्रीय रूट, राजकीय संरक्षणाची चर्चा अशा सर्व घडामोडींमुळे धुळेकरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होईल का, दोषींवर कठोर कारवाई होईल का – याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



