मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील ३१ ठिकाणी भव्य उपक्रम; मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदतीचीही घोषणा
धुळे दर्पण न्यूज :- राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, मंगळवारी (ता. २२ जुलै) भारतीय जनता पक्षातर्फे धुळे शहरातील विविध भागांमध्ये भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून तब्बल ३,००० ते ४,००० बाटल्या रक्तसंकलनाचे मोठे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या महादानात सहभागी होण्याचे आवाहन आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी केले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या महारक्तदान शिबिराबाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी आज सकाळी मालेगाव रोडवरील भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार अग्रवाल बोलत होते. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशील महाजन, जितेंद्र शहा, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, माजी नगरसेविका भारती माळी, मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, पवन जाजू, वैशाली शिरसाट, आकाश परदेशी, पृथ्वीराज पाटील, मोहिनी गौड आदी मान्यवर उपस्थित होते.
![]() |
| - Advertisement - |
आमदार अग्रवाल यांनी सांगितले की, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन होत आहे. त्यानुसार, धुळे शहरातील ३१ ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येणार असून, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडेल.
रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असून, रक्तदात्यांना खास गिफ्ट देण्यात येणार असल्याचेही आमदार अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. शहरातील तरुणाई, तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वच नागरिकांनी या महाशिबिरात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या या उपक्रमातून धुळे शहर लोकसंख्येच्या मानाने राज्यात सर्वाधिक रक्तसंकलन करणारे शहर व्हावे, यासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. धुळे शहरातील प्रत्येक भागात हा उपक्रम पोहोचवून ३ हजार बाटल्या रक्तसंकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा दृढनिश्चय करण्यात आला आहे.
![]() |
| - Advertisement - |
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीची घोषणा
या पत्रकार परिषदेत एक स्तुत्य उपक्रम देखील झाला. आमदार अनुप अग्रवाल यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी स्वतः एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच भाजपचे पदाधिकारी जितेंद्र शहा यांनीही पत्रकार परिषदेतच दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. व्यंगनगरीचे संपादक आणि ज्येष्ठ छायाचित्रकार राजेंद्र सोनार यांनीही दोन हजार रुपयांचा धनादेश देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आपला हातभार लावला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या उपक्रमामुळे धुळे शहर पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात पुढे सरसावले असून, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिर शहरातील एक मोठा सामाजिक उत्सव ठरणार आहे.



