धुळे दर्पण न्यूज :- धुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर तडा गेला असून फलाट आणि रेल्वेगाडीमधील अंतर हे भारतीय रेल्वेच्या मानकांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, वृद्ध, अपंग, महिला आणि लहान मुलांसह सर्वसामान्य प्रवाशांना चढ-उतार करताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असून येत्या आठ दिवसांच्या आत सुधारणा न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेच्या राज्य सचिव प्राची कुलकर्णी यांनी दिला आहे.
![]() |
| - Advertisement - |
मंगळवारी मनसे आणि जनहित संघटनेच्यावतीने स्टेशनप्रबंधकांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस अजित राजपूत, शामक दादाभाई, नीलेश गुरव, उज्वला दादाभाई, विजया गुरुबा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रेल्वेचे नियम धाब्यावर
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, फलाट आणि रेल्वेगाडीमधील अनुलंब अंतर १५.८७५ मिमी आणि क्षैतिज अंतर ७६.२ मिमी असणे आवश्यक आहे. मात्र, धुळे रेल्वेस्थानकावर हे अंतर मानकांपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरून ट्रेनमध्ये चढताना अथवा ट्रेनमधून उतरतानाचा त्रास वाढला असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
जबाबदार कोण?
या कामासाठी जबाबदार असलेल्या ठेकेदार व देखरेख करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. "भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?" असा सवाल उपस्थित करून संबंधितांवर तातडीने कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली आहे.
![]() |
| - Advertisement - |
मनसेचा इशारा
"प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. येत्या आठ दिवसांत या समस्येची दखल घेऊन दुरुस्ती न झाल्यास मनसेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल," असा ठाम इशारा प्राची कुलकर्णी यांनी दिला आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
धुळे शहरातील हे रेल्वेस्थानक असंख्य प्रवाशांचे दैनंदिन जीवन जोडणारे महत्त्वाचे केंद्र असून याठिकाणी सुरक्षेचा मुद्दा प्राधान्याने सोडवणे आवश्यक आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



