चाळीसगावमध्ये २५ हजारांची लाच घेताना महिला तलाठीसह तिघे जाळ्यात

  धुळे दर्पण न्यूज :- चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथे एका वडिलोपार्जित शेतजमिनीवरील जुनी व कालबाह्य नजर गहाण नोंद ७/१२ उताऱ्यावरून कमी करण्यासाठी थेट २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी चाळीसगाव तहसील कार्यालयाबाहेर सापळा रचून महिला तलाठी, रोजगार सेवक आणि स्थानिक दलाल अशा तिघांना लाच घेताना रंगेहात पकडले.

लाचेखोरीचा कटमहिला तलाठी आणि रोजगार सेवकाचा संगनमत
  तक्रारदाराने त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीवरील जुनी नोंद कमी करण्यासाठी महसूल विभागात अर्ज केला होता. त्यानंतर तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांनी तक्रारदारास थेट वाडीलाल रोहिदास पवार या रोजगार सेवकासोबत संपर्क साधण्यास सांगितले. पवार यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “तुमचं काम मोठं आहे, मोमीन मॅडम सांगत आहेत – २५ हजार रुपये द्यावे लागतील, नाहीतर काम होणार नाही.”
- Advertisement -

धुळे एसीबीची शिताफीने आखलेली कारवाई
  या संपूर्ण प्रकारावर तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदवली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर, ३० जुलै रोजी सायंकाळी धुळे एसीबीच्या पथकाने चाळीसगाव तहसील कार्यालयाजवळ सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, तक्रारदाराने वाडीलाल पवार यांच्याकडे २५ हजार रुपये दिले. त्यानंतर, पवार हे रक्कम तलाठी मोमीन यांना देण्यासाठी जात असताना, एसीबीच्या पथकाने त्या दोघांना रंगेहात अटक केली. याच प्रकरणात एक स्थानिक दलाल दादा बाबू जाधव यालाही पकडण्यात आले.

गुन्हा दाखल; महसूल विभागात खळबळ
  या प्रकरणी तिघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचखोरीच्या या प्रकारामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
- Advertisement -

अधिकार्यांचे मार्गदर्शन आणि प्रशंसनीय कारवाई
ही कारवाई नाशिक विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे आणि त्यांच्या पथकाने केली. महसूल खात्यातील लाचखोरीवर ही मोठी आणि ठोस कारवाई मानली जात आहे.


धुळे दर्पण

मुख्य संपादक : सैय्यद सानिल

(B.Com, M.Com, M.A.MCJ)

📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -